मुंबईकरांनाही वाढीव बिलाचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:55 AM2020-06-18T01:55:06+5:302020-06-18T01:55:17+5:30
लगा, लगा शॉक लगा : मार्च ते मे महिन्यातील फरक आला सध्याच्या वीजबिलात
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महावितरणसह मुंबईतल्या वीज कंपन्यांनीही आपापल्या वीजग्राहकांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याची सरासरी वीजबिले पाठविली. मात्र आता अनलॉकनंतर प्रत्यक्ष मीटरचे रिडिंग घेऊन वीजग्राहकांना वीजबिले पाठविली जात असून, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत आता येत असलेली वाढीव वीजबिले पाहून वीजग्राहकांनाही शॉक बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे अदानीच्या वीजग्राहकांनी तर वाढीव वीजबिले आल्याच्या तक्रारीही कंपनीकडे केल्या आहेत.
अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग, वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या दोन-अडीच महिन्यांच्या वीज वापरानुसार एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारा स्लॅब बेनेफिटही देण्यात आला आहे. तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून प्राप्त माहितीनुसार, आता विजेचे रीडिंग घेण्याचे काम सुरू झाले आहे.
तत्पूर्वी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात वीजग्राहकांना जी वीजबिले पाठविण्यात आली; ती वीजबिले डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या सरासरी वीजबिलानुसार होती. एप्रिल आणि मे महिन्यांत बहुतांश ठिकाणी वर्क फ्रॉम होम झाले. शिवाय उन्हाळा होता. आणि परिणामी विजेच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे साहजिकच पुरवठाही वाढला. साहजिकच अधिक वीज वापरली गेली. मात्र तेव्हाची वीजबिले ही रीडिंगनुसार नाही तर गेल्या तीन महिन्यातील म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यातील वीजबिलांच्या सरासरीवर काढण्यात आली. त्यामुळे ती कमी आली.
मात्र आता रीडिंग सुरू झाले असून, त्यानुसार आता पुढील वीजबिले ग्राहकांना येत आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील फरक जूनच्या बिलात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वीजबिले ग्राहकांना व्याजासह हप्त्यानेसुद्धा भरता येणार असून, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसारच वीजबिलाची कार्यवाही झाली आहे, असेही अदानी इलेक्ट्रिसिटीकडून स्पष्ट करण्यात आले.
वीजवापरानुसार एकत्रित बिल
अडीच महिने बंद असलेले वीजमीटर रीडिंग, वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या दोन-अडीच महिन्यांच्या वीज वापरानुसार एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे.