जनजागृतीमुळे रक्तदानात वाढ
By admin | Published: June 14, 2015 12:43 AM2015-06-14T00:43:57+5:302015-06-14T00:43:57+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये रक्तदानाविषयी झालेल्या जनजागृतीमुळे रक्तदानाचा टक्का वाढलेला आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी ऐच्छिक रक्तदानावर भर दिल्याने मुंबईत ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये रक्तदानाविषयी झालेल्या जनजागृतीमुळे रक्तदानाचा टक्का वाढलेला आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी ऐच्छिक रक्तदानावर भर दिल्याने मुंबईत ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी भरवल्या जाणाऱ्या रक्तदान शिबीरांमुळेही रक्तदानाचा टक्का वाढला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रुग्णालयातील रक्तपेढ्या आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये १० ते १२ वर्षांपूर्वी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असायचा. यावेळी एखाद्या रुग्णाचा नातेवाईक रक्त घेण्यास गेला तर त्यांना अधिक पैसे भरून रक्त विकत घ्यावे लागायचे. पण, आता या परिस्थितीत बदल झाला आहे. अनेकदा रक्तपेढ्यांमध्ये त्या विशिष्ट रक्तगटाचे रक्तच उपलब्ध नसायचे. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण करावी लागायची. पण, सध्या हे चित्र बदलेले आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध असते. फक्त शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही रक्तदानात वाढ होताना दिसत आहे. यामुळे
एखाद्या विशिष्ट रक्तगटाच्या रक्तासाठी वणवण करावी लागत नाही, आणि जास्तीचे पैसे देखील मोजावे लागत नाहीत, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
मोठा अपघात झाला, आपत्कालीन परिस्थितीत जखमींना रक्ताची गरज भासते. अशावेळी रक्तपेढ्यांमधून रक्त घेतले जाते अथवा एखाद्या नातेवाईकाकडून रक्त घेतले जाते. मध्यंतरीच्या काळात रक्तदान होण्याचे प्रमाण घटले असताना काही ठिकाणी रक्ताचा काळाबाजार व्हायचा. पण, आता असे होताना दिसत नाही. अनेकजण ऐच्छिक रक्तदान करतात. यामुळे राज्यातील रक्तदानाचा टक्का वाढलेला आहे. याचा फायदा म्हणजे रक्ताविषयी येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. आधी रक्तासाठी जास्त पैसे आकारले जातात, रक्त मिळत नाही अशा तक्रारी यायच्या. पण आता अशा तक्रारी येत नाहीत. लोकही रक्त खरेदी करताना ही माहिती घेऊन रक्तखरेदी करतात. यामुळे तक्रारी घटल्या असल्याचे एफडीएचे सहाय्यक आयुक्त ओमप्रकाश साधवानी यांनी सांगितले.