चॉकलेटची आवक वाढली, चवीची पडतेय भुरळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:16 AM2017-09-26T08:16:19+5:302017-09-26T08:39:40+5:30

नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू असून आता दसरा, दिवाळीचे वेध सर्वांना लागले आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये नवनवीन वस्तू ग्राहकांना आकर्षित करुन घेत आहेत.

Increased the chocolate outlook, the taste of tasting! | चॉकलेटची आवक वाढली, चवीची पडतेय भुरळ !

चॉकलेटची आवक वाढली, चवीची पडतेय भुरळ !

Next

सागर नेवरेकर/मुंबई, दि. 26 - नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू असून आता दसरा, दिवाळीचे वेध सर्वांना लागले आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये नवनवीन वस्तू ग्राहकांना आकर्षित करुन घेत आहेत. ग्राहकांनी बाजार फुलत असून खवय्यांसाठीही बाजारात विविध व्यंजने सजल्याचे चित्र दिसत आहे. मिठायांसह चॉकलेट म्हणजे छोट्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचीच पसंत. विविध चवींचे चॉकलेट्स सध्या बाजारात दाखल झालेले असून चॉकलेट्सच्या चवींची भुरळ सामान्यांना पडत आहे. 

सणांच्या दिवसांतील गोड भेटवस्तू म्हणजे ‘चॉकलेट’. दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, कुर्ला, चेंबूर या मोठ्या मार्केटमध्ये चॉकलेट्सनी दुकाने सजली आहेत. दिवाळीत खासकरुन भाऊबीजच्या दिवशी चॉकलेटला मोठी मागणी असते. कॅडबरी, नेस्ले, फेरेरो इंडिया, अमुल, मार्कस्, कॅम्पको, चॉकोन इंडिया, पारले, लोट्स, कॅडीमॅन हे देशी चॉकलेट्सचे ब्रँड सध्या बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट्सचे आंतरराष्ट्रीय प्रॉडक्ट्ही बाजारात सहज उपलब्ध होतात. 

गणेशोत्सवात मावा मोदक आणि उकडीच्या मोदकांपेक्षा चॉकलेट्सच्या मोदकांना यंदा मागणी होती. हाच ट्रेंड आता यापुढील सणांमध्येही सुरू राहील, असे काही विक्रेते आणि व्यापा-यांनी बोलून दाखविले. चॉकलेट्स हे प्रोडक्ट उत्तमरित्या बनवून ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, हे ओळखून घरगुती चॉकलेट्सनेही आपले विशेष स्थान निर्माण केलेले आहे. 

चिली चॉकलेट, पान चॉकलेट, मसाला चॉकलेट या प्लेव्हरमधील हॅण्डमेड चॉकलेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. डार्क (कडवट) चॉकलेट लोकांना जास्त आवडतात, असे म्हणणे एका विक्रेत्याने मांडले. स्विर्त्झलँड, बेल्जियम, जर्मनी, दुबई, पॅरिस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क इत्यादी देशातून चॉकलेट्ची मोठी आवक देशात होते. चांगल्या दर्जाचे चॉकलेट्स बाजारात ३ हजार रुपये किलो अशा दरानेही उपलब्ध आहेत. तसेच देशात बनलेले चॉकलेट्सही दीड हजार रुपये किलो अशा दराने बाजारात आहेत. यापुढे चॉकलेट्सची मागणी मिठाईपेक्षाही वाढेल, असे मत एका विक्रेत्याने व्यक्त केले. विदेशातील चॉकलेटांची ग्राहकांमध्ये वेगळीच भुरळ असते.

दिवाळीच्या तयारीची लगबग 
बाजारात स्वत:च्या चॉकलेट ब्रँडचं वेगळे महत्त्व आहे. मोर्डे, बॅलिकॅलेबर, लिबोन ब्रँडची चॉकलेट खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन काहीजण ब्रँड तयार करतात. शहरातील वेगवेगळ्या बाजारात या चॉकलेट्सना मागणी असते. दिवाळीमध्ये चॉकलेटची मागणी अधिक वाढते. त्यामुळे कामगारांची संख्या देखील वाढवावी लागते. - नीलम बोरा, चॉकलेट विक्रेता

चॉकलेट उद्योगात सुवर्णसंधी
महिलांसाठी चॉकलेट मेकिंगचे क्लासेस घेतले जातात. यात चॉकलेटच्या विविध कलाकृती तयार करुन बाजारात विकल्या जातात. प्रत्येकजण घरामध्ये चॉकलेट बनवू शकतो. व्यवसाय म्हणून देखील बहुसंख्य लोक या क्षेत्रात येत आहेत. चॉकलेट गुढी आम्ही बनवली होती. त्यालाही चांगली दाद मिळाली. पूर्वी डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेटला मिक्स करुन एक चॉकलेट बनविले जायचे. परंतु, आता अनेक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. चॉकलेट हा खूप मोठा उद्योग असून तरुणांना चॉकलेट उद्योगात सुवर्णसंधी आहे. - जान्हवी राऊळ, ब्रँड गुरू

चॉकलेटला चांगली मागणी
मॉर्डे चॉकलेट अन्य हॅण्डमेड वस्तू देखील बनवते. आंतराष्ट्रीय बाजारात बेल्जिअमच्या चॉकलेट कंपन्या प्रसिद्ध आहेत. त्या देखील हॅण्डमेड चॉकलेट बनवतात. सध्या बाजारात हॅण्डमेड चॉकलेट्सना मोठी मागणी आहे. हॅण्डमेड चॉकलेट फ्रेश असल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.  - गगनदीप सिंग, चॉकलेट विक्रेता

Web Title: Increased the chocolate outlook, the taste of tasting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.