मुंबई : सर्व वीज कंपन्यांकडून येणाऱ्या वाढीव बिलामुळे वीजग्राहक हैराण असताना बेस्ट उपक्रमाने मात्र सुखद धक्का दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात मार्च महिन्यातील बिलावर आधारीत पुढील तीन महिन्यांची बिले पाठवण्यात आली आहेत. यामध्ये आलेल्या वाढीव बिलांचा परतावा व्याजासह वीजग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे.बेस्ट उपक्रमामार्फत शहर भागातील सुमारे दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. २४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागामार्फत वीजपुरवठा अखंड सुरू आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत असल्याने बाधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व खबरदारी घेत मीटर रीडिंग सुरू आहे.या बिलामध्ये काही ग्राहकांना दुप्पट बिले पाठविण्यात आल्याच्या तक्रारी बेस्टकडे येत आहेत. तसेच आॅनलाइन बिल भरूनही काही ग्राहकांना बिले पाठविण्यात आली आहेत. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर, महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते. येथे झालेल्या चर्चेनुसार बेस्टच्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.बैठकीतील घेतलेले महत्त्वाचे निर्णयलॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या उद्योग-व्यवसायांना त्यांच्या अंदाजित वापराच्या १० टक्के बिल पाठविण्यात येणार आहे. या ग्राहकांना आपले वीजबिल पुढील तीन महिन्यांत भरण्याची सवलत असणार आहे. प्रलंबित आणि थकबाकीवरील व्याजाची परिगणना प्रत्यक्ष वीजवापराच्या आधारावर करण्यात येईल. वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम त्या ग्राहकांच्या वीजबिलामध्ये परत करण्यात येणार आहे.लॉकडाऊन काळात विजेच्या वापरात वाढलॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने घरगुती वीजवापराचे प्रमाण वाढले आहे. मार्च महिन्यातील वापरानुसार बिल देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर काही ग्राहकांचे बिल वाढू शकते, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या काळात काही ग्राहक गावी गेल्यामुळे त्यांचे घर, दुकान बंद असल्याने त्यांचे बिल कमीही होऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले.लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे प्रत्यक्ष रीडिंग घेण्याचे काम सुरू आहे. जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. कोरोनाचा प्रभाव असताना वीजग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडू नये, म्हणून अतिरिक्त बिल आले असेल तर ते व्याजासह खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- सुरेंद्रकुमार बागडे,बेस्ट महाव्यवस्थापक
वाढीव वीजबिलांचा बेस्ट ग्राहकांना मिळणार व्याजासह परतावा, कोरोना संकटात मुंबईकरांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 2:16 AM