लॉकडाऊनमध्ये वाढले सायकलचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:30+5:302021-06-04T04:06:30+5:30

ओमकार गावंड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल ...

Increased importance of cycling in lockdown | लॉकडाऊनमध्ये वाढले सायकलचे महत्त्व

लॉकडाऊनमध्ये वाढले सायकलचे महत्त्व

googlenewsNext

ओमकार गावंड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल जाणीव निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांमध्ये सायकल चालविण्याची ‘क्रेझ’ वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसभरात विशेषतः पहाटे मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सायकलची क्रेझ वाढल्याने सायकल व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत.

ऑफिसमध्ये जाण्यासाठी तसेच कमी अंतरावरच्या प्रवासासाठी नागरिक सायकलचाच वापर करू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी साधारण असलेला सायकलचा व्यवसाय काही महिन्यातच एवढी भरारी घेईल, असे सायकल व्यापाऱ्यांनादेखील वाटले नव्हते. त्यामुळे सायकल व्यापारीदेखील आनंदात आहेत तर सायकल दुरुस्त करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

घाटकोपर येथील सायकल व्यापारी आफरोज मलिक सांगतात की, सध्या भारतात सायकल हा एकमेव असा व्यवसाय आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात उभारी मिळाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सायकल विक्रीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुकानात सायकल व सायकलचे पार्ट यांचा तुटवडा भासत आहे. सायकलचे काही पार्ट हे केवळ चीनमध्ये बनतात. परंतु, चीनसोबत बिघडलेल्या व्यापार संबंधांमुळे ते पार्ट मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ग्राहकांनी सायकल खरेदी केल्यास त्यांना एक ते दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर सायकल मिळते. या आधी सायकलची विक्री व्हावी, यासाठी वेगवेगळ्या डिस्काऊंट ऑफर्स ठेवाव्या लागत होत्या. मात्र, आता ग्राहक आहे त्या किमतीत सायकल विकत घेत आहेत.

चेंबूर येथील सायकल विक्रेते जसपाल नारंग यांनी सांगितले की, माझ्या दुकानातून दररोज १०० सायकल विकल्या जातात. पाच हजार ते ५० हजारापर्यंतच्या सायकल माझ्या दुकानात उपलब्ध आहेत. साधारणतः ग्राहक १० ते २० हजार दरम्यान उपलब्ध असणारी सायकल पसंत करत आहेत. तरुण विशेषतः गिअर असलेली सायकल घेणे पसंत करत आहेत. ग्राहक भारतीय ब्रँडची सायकल घेणे जास्त पसंत करत आहेत. सायकलची मागणी जास्त आहे, परंतु पुरवठा कमी असल्याने अनेक ग्राहकांना दुकानातून रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.

तर कुर्ला येथील रहिवासी विद्येश धनावडे यांच्या म्हणण्यानुसार आता सायकल चालविणाऱ्यांसाठी लोकांच्या मनात आदर निर्माण झाला आहे. सायकल ही दुचाकीपेक्षा कमी वेगाने धावत असल्याने याआधी बाईक व कार चालकांकडून सायकलस्वारांना अपमान सहन करावा लागत असे. मात्र, आता सायकल चालवताना रस्त्यात अनेकजण थम्सअप करतात. यामुळे सायकलच्या वापरासोबतच नागरिकांमध्ये तिच्याप्रती आदरही वाढला आहे.

..................................

Web Title: Increased importance of cycling in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.