Join us

गोवंडी आजारांचं आगार...इथे जीव रोजच गुदमरतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 3:59 PM

गोवंडी व परिसर आजारांचं आगार बनला आहे.

संजीव साबडे, मुक्त पत्रकार :

गोवंडी व परिसर आजारांचं आगार बनलं आहे. तिथं भंगारवाले व त्यांची गोदामं भरपूर. तिथं इंडियन ऑइल कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. कचरा डेपोच्या समोर, पण आतील बाजूस म्हाडाच्या चार मजली, सात मजली इमारती. तिथल्या लिफ्ट बऱ्याचदा बंदच. अशा वातावरणात इथं भांडणं, मारामाऱ्या, एकमेकांवर हल्ले, हत्या असे गुन्हे होतच असतात. हे मुंबईतल्या टोकावरच्या गावाचं वास्तव आहे.

पूर्व द्रुतगती  मार्गावरून नवी मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी वाहनातून घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडकडे वळलो आणि शिवाजीनगर सिग्नलवरून पुढे सरकलो की, तिथं वेगवेगळे व विचित्र वास येऊ लागतात. मग हळूहळू त्या वासांचा भयंकर त्रास होतो आणि आपल्याला त्या वासांनी गुदमरल्यासारखं होतं. सारं अस्वच्छतेचं साम्राज्य असतं. कचऱ्याचे कैक ट्रक तिथं उभे असतात. शेजारच्या नाल्यात ओला आणि सुका कचरा मिसळल्याने दुर्गंधी पसरलेली असते. सर्व्हिस रोडवरून लोक कसे चालतात, कोणास ठाऊक. त्याच्या पलीकडे प्रचंड डोंगर... कचऱ्याचा. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना चुकवून किंवा त्यांना ५० वा १०० रुपये देऊन आत शिरलेले आणि कचऱ्यात काही भंगार वस्तू मिळतात का? त्या विकून दिवसाचा खर्च निघेल का? याचा विचार करून कचरा वेचणाऱ्या तरुण-तरुणी आणि अगदी वयस्कही. तो कचऱ्याचा विशाल डोंगर त्यांना दोनवेळ खाऊ घालतो. पण आपण अर्धा मिनिटही उभं राहू शकत नाही. मळमळायला लागतं आपल्याला. या कचरा वेचकांच्या पायात स्लीपर, ना हातात ग्लोव्हज् ना तोंडावर रूमाल. आधी विरुद्ध दिशेला लागतो महापालिकेचा देवनार कत्तलखाना. तिथं रोज हजारो जनावरांची कत्तल केली जाते. 

फ्लायओव्हरवरून गलिच्छ साम्राज्य आणि जीवघेणा व गुदमरवणारा वास जाणवणार नाही. पण पुलाखालून जाताना कचरा आगारापाशी थांबून पाहा. त्या कचऱ्याला जवळपास रोज आग लागते. कचऱ्याला आग लागली की, स्थानिक लोकांना श्वासही घेता येत नाही. जवळ स्टेशन आहे गोवंडी. शिवाजीनगर, बैंगनवाडी ही वस्त्यांची नावं फक्त आपल्याला माहीत असतात. इथे कचऱ्याला आग लागली की डोळे चुरचुरतात, आग होते, डोळ्यातून पाणी वाहतं. प्रत्येक घरात सतत कोणी आजारी असतं. श्वास घेण्याच्या त्रासामुळे, त्वचेचे आजार, केस गळणं, लहान मुलांना ओकाऱ्या होणं, जेवण न जाणं, त्यातून पोट बिघडणं असे त्रास रोजचे. त्यातून कामाचा खाडा, शाळेला दांडी, मासिक पाळीवर परिणाम आणि अनेकांना क्षयरोग. गोवंडी व आसपासचा परिसर आजारांचा आगार बनला आहे. पावसाळ्यात संकट वाढतं. पावसाचं पाणी गटार भरून रस्त्यावर आणि तिथून घरात शिरतं. त्याबरोबर गांडूळ, बेडूक, विविध कीटक, कचऱ्यामुळे उंदीर व डास हे सारं येतं. मराठी व तामिळ दलित, काठेवाडी, मुस्लिम आणि अलीकडे बिहार व युपीवाले हेच गोवंडी परिसरातील झोपड्या व अनधिकृत बांधकामांत राहतात. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकाकचरा प्रश्न