मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. परंतु यंदा कुर्ला व चेंबूर परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. थोडा वेळ जरी मुसळधार पाऊस पडला तरी या लोकवस्त्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरादेखील लवकर होत नसून नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.लॉकडाऊनच्या काळात पालिकेची पावसाळ्यापूर्वीची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यात नालेसफाईची कामेदेखील अर्धवट राहिल्याने यंदा पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुर्ला पूर्व येथील नेहरू नगर, शिवसृष्टी, ठक्कर बाप्पा, कुर्ला सिग्नल तसेच चेंबूरमधील पोस्टल कॉलनी, पी. एल. लोखंडे मार्ग, उमरशी बाप्पा चौक सुमन नगर, सिंधी सोसायटी व सिंधी कॅम्प या जास्त लोकवस्ती असलेल्या परिसरांमध्ये सतत पाणी तुंबत आहे. यातील काही परिसर कंटेनमेंट झोनमध्ये येत असल्याने, येथील नागरिकांमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या परिसरांमध्ये पालिकेने नालेसफाई करावी तसेचपाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
चेंबूर, कुर्ला येथील दाट लोकवस्तीच्या भागात पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ, नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:36 AM