Join us

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये अपचनाच्या समस्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साधारणतः खोकला, ताप, अंगदुखी, मेंदुविकार, थकवा जाणवणे व श्वास घेण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साधारणतः खोकला, ताप, अंगदुखी, मेंदुविकार, थकवा जाणवणे व श्वास घेण्यास अडचणी येणे अशी लक्षणे दिसतात. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये अपचनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोरोनानंतर जठराशी संबंधित विकार जाणवल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.

सैफी रुग्णालयातील लेप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा भास्कर म्हणाल्या की, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये भूक न लागणे, मळमळ व उलट्या होणे, अतिसार आणि आतड्यांचे विकार अशा तक्रारी जाणवू लागल्या आहेत. अनेक रुग्ण सध्या आमच्याकडे या समस्या घेऊन येत आहेत. उपचार करताना प्रतिजैविक, अँटीवायरल, अँटीफंगल, अँटीमेलेरियल आणि स्टिरॉइड्ससारख्या औषधांचा अधिकाधिक काेराेना रुग्णांसाठी वापर करणे गरजेचे आहे.

डॉ. अपर्णा पुढे म्हणाल्या की, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ही अपचनाची समस्या टाळण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. मेदयुक्त, तेलकट, खारट, जंकफूडचे सेवन करणे टाळावे. साखरेचा अतिरिक्त वापर करू नये. बाहेरील खाद्यपदार्थांचे वारंवार सेवन करू नये. वेळेवर पाैष्टक जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. नियमित आहारात कोशिंबीर, फळे आणि दही यांचा समावेश करा. जास्त खाणे टाळा. दिवसातून एक किंवा दोन कप चहा आणि कॉफीचे सेवन करा. धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन टाळा. पुरेसे पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व योग करा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही फिटनेस अ‍ॅप्सचे अनुसरण करू शकता. स्वच्छतेवर भर द्या. वॉशरूमचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. ताणतणावापासून दूर राहा. कारण, मानसिक तणाव हा पचनक्रियेवर वाईट परिणाम करतो.

* अपचनाची कारणे

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण घरातच होता. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी प्रत्येक जण तेलकट, मसालेदार पदार्थ बनवून खात होता. या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद असली तरी होम डिलिव्हरी सुरू आहे. त्यामुळे अनेक जण ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवतात. याव्यतिरिक्त कौटुंबिक समस्या, नोकरी जाण्याची भीती, आर्थिक अडचणी आणि जवळच्या नातेवाइकांना भेटू न शकणे यामुळे अनेकांमध्ये मानसिक समस्या निर्माण हाेऊन त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

...............................