मूल्यांकन आणि प्रवेशाच्या कार्यपद्धतीनी वाढला गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:31+5:302021-05-30T04:06:31+5:30

मुंबई : गेले वर्षभर शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण त्यात शिक्षण विभागाकडूनच आलेले परीक्षा न घेण्याचे फतवे आणि आता तोंडी ...

Increased involvement in assessment and admissions procedures | मूल्यांकन आणि प्रवेशाच्या कार्यपद्धतीनी वाढला गुंता

मूल्यांकन आणि प्रवेशाच्या कार्यपद्धतीनी वाढला गुंता

Next

मुंबई : गेले वर्षभर शाळा बंद, ऑनलाईन शिक्षण त्यात शिक्षण विभागाकडूनच आलेले परीक्षा न घेण्याचे फतवे आणि आता तोंडी परीक्षा या सगळ्या अस्पष्ट आणि नेमकेपणाचा अभाव असणाऱ्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि शिक्षक गोंधळले आहेत. अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीचा निकाल लावताना गुंता अधिक वाढणार आहे. तसेच निकालाबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार असेल, तर मग दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणे शक्य होते, असे काही शिक्षणतज्ज्ञांना वाटत आहे. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि अकरावीसाठी होणारी ‘सीईटी’याबाबत शिक्षण क्षेत्रातून विशेषतः शिक्षक, मुख्याध्यापकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नववीची परीक्षा विद्यार्थी फारशी गांभीर्याने देत नाहीत. बहुतांश विद्यार्थी दहावीला बोर्डाची परीक्षा असल्यामुळे ती गांभीर्याने देतात. त्यामुळे त्याआधारे मूल्यमापन करण्यासाठी ५० गुण देणे, हे योग्य वाटत नाही. त्यातच शिक्षण विभागाच्या सूचनांप्रमाणे मुंबई, पुण्यासारख्या शहरांत उपसंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसारच परीक्षा घेतल्या नाहीत मग आता त्या परीक्षांचे नियोजन प्रचलित पद्धतीने करायचे म्हणजे नेमके काय, यात स्पष्टता नसल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली.

श्रेणीसुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच आहे तर तीन-तीन मूल्यांकनाचा घाट घालण्याऐवजी दहावीच्या उत्तीर्णतेसाठी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य होते, असे मत त्यांनी मांडले आहे. दरम्यान शिक्षण विभागाचा निर्णय कितीही संभ्रमात टाकणारा असला तरी आम्ही तो विद्यार्थी हितासाठी डावलू शकत नाही. मात्र, सद्यस्थितीत आम्ही वाट पाहत असल्याची भूमिका मुख्याध्यापक संघटनेने मांडली आहे.

लेखी आणि तोंडी परीक्षांची गुण विभागणी कशी करणार?

राज्यातील जवळपास ४० टक्के शाळांमध्ये लेखी परीक्षा झालेली नाही. मग या गुणांचे समानीकरण कसे होणार, हा प्रश्न आहे. तोंडी परीक्षा झाली नाही, गुण देण्यासाठी आता या परीक्षा कशा घ्यायच्या, हेही शाळांना कळत नाहीये. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत. त्याशिवाय दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून जाहीर झालेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसतील, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा होणार आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा घेण्याला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरातील एका मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

एकूणच शिक्षण विभागाच्या नवीन मूल्यमापन धोरणामुळे दहावीच्या निकालाची इत्यंभूत जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर येऊन पडल्याने आता ते ही गोंधळले आहेत. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अशीच चालू राहिली तर जून अखेरपर्यंत निकाल लावणेही अवघड होईल, असा सूर त्यांच्यामधून मांडला जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हा गोंधळ मार्गी लावण्याची मागणी ते करत आहेत.

Web Title: Increased involvement in assessment and admissions procedures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.