Join us  

वाडियात हिमोडायलेसिस घेणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ

By admin | Published: March 14, 2016 2:07 AM

गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये हिमोडायलेसिस घेणाऱ्या मुलांची संख्या साडेचारशेनी वाढली

मुंबई : गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये हिमोडायलेसिस घेणाऱ्या मुलांची संख्या साडेचारशेनी वाढली असल्याची माहिती वाडिया रुग्णालय प्रशासनाने दिली. मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम झाल्यास व्यक्ती आजारी पडून गुंतागुंत वाढू शकते. मूत्रपिंडाचे आजार वाढल्यास रुग्णाला डायलिसिस करावे लागते. सध्या वाडिया रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दरवर्षी किडनीच्या आजाराच्या फॉलोअपसाठी १० हजार रुग्ण येतात, अशी माहिती वाडिया रुग्णालयाच्या संचालिका डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली. डॉ. बोधनवाला यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरवर्षी ९६० ते १०२० नवे रुग्ण मूत्रपिंडाच्या उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. याचबरोबर हिमोडायलेसिसचे प्रमाणही वाढताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये हिमोडायलेसिस घेणाऱ्यांमध्ये ४५०ने वाढ झालेली आहे. २०१२-१३ या वर्षात ६४९ रुग्ण हिमोडायलेसिसचे उपचार घेत होते. सध्या १ हजार १०० रुग्ण हिमोडायलेसिसचे उपचार घेत आहेत. आजाराचे लवकर निदान झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्यापासून वाचवता येऊ शकते. त्यामुळे लवकर निदान उत्तम उपाय आहे. (प्रतिनिधी)