विमान कंपन्यांची प्रवासी वहनक्षमता वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:41+5:302021-07-08T04:06:41+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान कंपन्यांची प्रवासी वहनक्षमता ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली होती. आता रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान कंपन्यांची प्रवासी वहनक्षमता ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली होती. आता रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे त्यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ६५ टक्के प्रवासी क्षमतेसह विमानांना उड्डाण करता येईल.
हवाई मार्गाने कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत असल्याच्या चर्चा पहिल्या लाटेच्या काळात पसरल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि अंतर नियम पालनासाठी विमानातील एकूण प्रवासी क्षमतेवर मर्यादा आणण्यात आल्या. पहिल्या लाटेत प्रवासी क्षमता ८० टक्के इतकी ठरविण्यात आली. मात्र, दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्यानंतर ती ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांसमोर चिंतेचे वातावरण तयार झाले.
जूनपासून दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने प्रवासी क्षमता पूर्ववत करण्याची मागणी विमान कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे विमान कंपन्यांसमोरील अडचणी आणि वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता, हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी क्षमता ६५ टक्के इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत विमानांना ३१ जुलैपर्यंत हे आदेश लागू राहतील. त्यानंतरची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.