विमानांची प्रवासी वाहतूक क्षमता ८५ टक्क्यांपर्यंत वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:24+5:302021-09-21T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या विमानांची प्रवासी वाहतूक क्षमता ८५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या विमानांची प्रवासी वाहतूक क्षमता ८५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. कोरोनामुळे विमानांच्या प्रवासी वाहन क्षमतेवर निर्बंध लागू करण्यात आले असून, याआधी ही मर्यादा ७२ टक्के होती.
हवाई मार्गाने कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत असल्याची चर्चा पहिल्या लाटेच्या काळात होती. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि अंतर नियम पालनासाठी विमानातील एकूण प्रवासी क्षमतेवर मर्यादा आणण्यात आल्या. लॉकडाऊनदरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली. डिसेंबर २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली.
मात्र, दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे १ जून २०२१ रोजी पुन्हा एकदा वाहन क्षमता ५० टक्क्यांवर आणण्यात आली. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. जूनपासून दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने प्रवासी क्षमता पूर्ववत करण्याची मागणी विमान कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. विमान कंपन्यांसमोरील अडचणी आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी क्षमता ६५ टक्के करण्याचा निर्णय ५ जून रोजी घेतला. त्यानंतर १२ ऑगस्टला ती ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली.
आता पुन्हा एकदा देशांतर्गत वाहतुकीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानांची प्रवासी वाहन क्षमता आता ८५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.