रुग्णसंख्येचे वाढते आकडे, लाॅकडाऊनची भीती; काळजीने उडाली झाेप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोराेनाच्या रुग्णसंख्येचे वाढते आकडे आणि त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला जाणार का? याबाबत वाटणाऱ्या सततच्या भीतीमुळे तुम्हाला रात्री झोप लागत नाही का? असे असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. बातम्यांचे लक्षवेधी मथळे, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील धूसर होत चाललेल्या सीमारेषा आणि सततची अनिश्चितता यामुळे लाेकांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. या विचारांमुळे रात्रीच्या वेळीही मेंदूतील विचारांची साखळी सुरूच राहते किंवा पहाटेच्या वेळी धसक्याने जाग येते. असे होत असल्यास ते इनसोम्निया म्हणजे निद्रानाशाच्या वाढलेल्या शक्यतेचे सूचक आहे. तर सध्या काेराेनामुळे काेराेना आणि इनसोम्निया मिळून ‘कोरोनासोम्निया’चा धाेका वाढत आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस (आयआयएसएस)ने १५० लोकांची पाहणी केली. या संशोधनातून असे दिसून आले की, १५० पैकी २५ ते ३० टक्के लोकांना नॉन-रिस्टोरेटिव्ह झोपेचा त्रास होता. काेराेना लॉकडाऊनचा झोपेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाशी आणि रात्रीच्या झोपेचे प्रमाण व दर्जा या दोघांशीही संबंध असल्याचे देशातील काही प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि न्युरोलॉजिस्ट्सनी मे २०२० मध्ये केलेल्या आणखी एका देशांतर्गत संशोधनातून समाेर आले. हे बदल प्रामुख्याने भावनिक लक्षणांच्या वाढलेल्या प्रमाणाशी संबंधित आहेत.
सध्या सुरू असलेल्या गोष्टी या लोकांना अधिक असहाय्य बनवत आहेत. यामुळे त्यांच्या मनावर अगदी सहज तणाव येताे. हे एक दुष्टचक्रच आहे. तुम्हाला झोप मिळत नाही, तेव्हा तुमच्या भावना अधिक तीव्र बनतात. या भावनांचे नियमन करण्याची तुमची क्षमताही क्षीण होत जाते, त्यामुळे मनावरचा ताण वाढविणाऱ्या गोष्टी अधिकच त्रासदायक वाटू लागतात, मन शांत करण्याची आपली क्षमताही कमी होते, अशी माहिती कन्सल्टन्ट पल्मोनोलॉजिस्ट व स्लीप मेडिसिन तज्ज्ञ डॉ. अंशु पंजाबी यांनी दिली.
* कोरोनासोम्निया म्हणजे काय?
२०२० मध्ये गुगलवर ‘इन्सोम्निया’ या शब्दाचा अर्थ पूर्वी कधी नव्हे इतक्यांदा शोधला गेला. तज्ज्ञांनी याला ‘कोरोनासोम्निया’ असे नाव दिले आहे. महामारीमुळे निर्माण झालेल्या ताणतणावांमुळे तयार झालेली ही स्थिती असते. पण, या इन्सोम्नियाला विषाणू नव्हे, तर भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरत आहे.
* सध्याच्या काळात लोकांच्या चिंतेत भर घालणाऱ्या काही गोष्टी :
नोकरी गमावण्याची, आर्थिक अस्थैर्याची भीती, विषाणूची भीती, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात फारच कमी समतोल असणे किंवा तो अजिबातच नसणे, रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य राखण्याविषयी सततची चिंता, झोपेचे बिघडलेले वेळापत्रक.
* हे आहेत उपाय
नियमित वेळापत्रकाचे पालन करा. ‘वाइंड डाऊन’ची वेळ निश्चित करा. मोबाइल फोन्स आणि लॅपटॉपपासून शक्य तितके दूर राहा. जेवण आणि झोप यांच्यादरम्यान सुमारे एक ते दीड तासाचे अंतर ठेवा. बिछान्यात असताना आपले घड्याळ तपासू नका. या सर्व प्रयत्नांनंतरही तुम्हाला रात्री मध्येच कधीतरी जाग आलीच तर दुसऱ्या आरामशीर, शांत खोलीत जा आणि वाइंड-डाऊनच्या वेळेत तुम्ही जे करत होता तेच करा. पुन्हा एकदा झोप यायला हवी हे अंतिम लक्ष्य समोर ठेवा. कोरोनासोम्नियाचा अनुभव तात्पुरता असू शकतो. याविषयी फिजिशियनशी बोलणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला काही सोपे उपाय सांगून किंवा गरज भासल्यास औषधे देऊन तुमच्या झोपेचे बिघडलेले वेळापत्रक दुरुस्त करण्यासाठी मदत करू शकतील, असे डॉ. पंजाबी यांनी सांगितले.
...............................................