मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. याखेरीज बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे; त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात शहर उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.
मुंबईत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण अधिक आहेत. केवळ ऑगस्ट महिन्यात ७९० मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूचे १३२ रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण २०९ रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या ३३३८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात मलेरियासह गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद असून रुग्ण त्रासले आहेत. आठ महिन्यांत १८४८ गॅस्ट्रो रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे लहानांना ओआरएस, डाळीचे पाणी, ताक यासारखे इतर द्रवपदार्थ देण्याचा सल्ला दिला जात आहे. तर, आजारी मूल इतर मुलांच्या संपर्कात येणार नाही, याची खात्री पालकांनी करून घेणे आवश्यक आहे. जानेवारी महिन्यापासून
मुंबईत मलेरियाचे ३३३८ रूग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे १३३ रूग्ण, डेंग्यूचे २०९, गॅस्ट्रो आजाराचे १८४८, तर काविळीचे १६५ तसेच स्वाइन फ्लू आजाराचे ४५ रूग्ण गेल्या आठ महिन्यांत आढळले असल्याचे सांगण्यात आले.