पोटविकारांचा वाढता धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:25+5:302021-06-17T04:06:25+5:30
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप ...
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. जंक फुडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, बैठे काम अशा घातक जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येते.
पचनक्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठ, आतड्यांतील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा पित्त (ॲसिडिटी) असे आजार होऊ शकतात. पाच-सहा वर्षांपर्यंत मुलाचे सर्व जेवण पालकांच्या हातात असते. बाळाला सर्व प्रकारचे पौष्टिक घटक मिळावेत म्हणूनही प्रयत्न केले जातात. मात्र तरीही रोजच्या या त्रासाने पालक कंटाळतात. काही वेळा घरगुती उपाय केले जातात. जेवणातील पदार्थ बदलले जातात. मात्र, त्याने फारसा फरक पडत नाही. कारण बद्धकोष्ठतेसाठी केवळ जेवण हे एकमेव कारण नसते. मुलांच्या दिवसभरातील हालचाली, त्यांची मानसिकता, औषधे, झोप हे घटकही परिणामकारक ठरतात, अशी माहिती पोटविकारतज्ज्ञ डॉ. केयूर शहा यांनी दिली आहे.
मागील दीड वर्षांत लहानग्यांची जीवनशैली बदलली आहे. यात लहानग्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. यामुळे शारीरिक व्यायाम, चालणे, मैदानी खेळ असे प्रकार थांबले आहेत. परिणामी, बैठ्या जीवनशैलीमुळे पोटविकार बळावताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात पचनक्रियेसंबंधी आजार पाहावयास मिळत आहेत. अन्नमार्गातून पुढे सरकणारे अन्न हळूहळू पुढे जात राहते, त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो, पोट जड होते व लोकांमध्ये बद्धकोष्ठता सुरू होते. मंदावलेल्या हालचालीमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवून खूप तास गेले, तरी पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही.
पोटविकाराची प्रमुख कारणे
बद्धकोष्ठ
छातीत जळजळणे किंवा दुखणे
पोटात फुगवटा आणि वात येणे (ब्लोटिंग)
उलटी येणे-पित्त
आतड्यातील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)
पित्ताचा खडा (गॅल स्टोन्स)
वारंवार शौचास जावे लागणे
अपूर्ण मलविसर्जन
पोटविकार टाळायचे असतील तर
जेवण झाल्यानंतर बसून राहू नये, दहा मिनिटे चालावे.
टीव्ही वा मोबाईल पाहत जेवत बसणे टाळावे.
पचायला जड असणारे तेलकट पदार्थ टाळावे ,निदान रात्रीच्या वेळेस हे पदार्थ खाऊ नये.
रस्त्याकडील स्टॉलवरील पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.
फळे, भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा.
वजन नियंत्रित असणे महत्त्वाचे
डॉ. रागिणी इनामदार, पोटविकारतज्ज्ञ
आजाराचा सामना करण्यासाठी मुलांचे वजन प्रमाणात असणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. मुलांना ताप आहे का, पुरळ येत आहे का, अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांचा संपर्क टाळावा.
स्क्रीन टाईमला आळा घाला
डॉ. नेत्रा पारेख, पोटविकारतज्ज्ञ
वाढत्या स्क्रीन टाईममुळे लहानग्यांच्या आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. किंबहुना यामुळे लहानग्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, यातूनच स्थूलता, निद्रानाश, दृष्टिदोष संभवतो.