Join us

लहानग्यांना स्थूलतेचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा बंद, खेळण्यास असलेली बंदी, स्क्रीन टाइम अशा विविध कारणांमुळे लहानग्यांना ...

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळा बंद, खेळण्यास असलेली बंदी, स्क्रीन टाइम अशा विविध कारणांमुळे लहानग्यांना स्थूलतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात कोविडची लागण झालेल्या लहानग्या रुग्णांमध्ये या स्थूलपणामुळे गुंतागुंत निर्माण होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.

अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आलेल्या किंवा व्हेंटीलेटरवर उपचार केलेल्या ३०-४० टक्के लहान रुग्णांचे वजन हे स्थूलतेकडे झुकणार होते. शिवाय, स्थूलपणामुळे कोरोनातून उपचार घेण्याचा कालावधीही वाढत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. मागील काही दिवसांत स्थूलतेमुळे लहानग्यांमध्ये मधुमेह, श्वसनविकार आणि हृदयविकाराचा धोका असल्याचेही दिसून आल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवमणी शहा यांनी सांगितले.

दीड वर्ष घरात राहिल्यामुळे लहानग्यांमध्ये चिडचिड व राग वाढला आहे. परिणामी, जंक फूडचे सेवनही वाढले आहे. शिवाय, झोपेच्या वेळा, खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायाम-ताणतणाव यातून लठ्ठपणाच्या समस्या दिसून येतात. याविषयी, डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला नाही, तर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कमलेश धावडे यांनी दिली.

* जीवनशैली सुधारण्यावर भर देणे गरजेचे

अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, लठ्ठपणातून अन्य अतिजोखमीच्या आजारांचा गंभीर धोका असतो. यात कमी वयात मधुमेह, हृदयविकार, इन्फ्लेमेशन, थ्रोम्बोयसिससारखे आजार होतात. त्यामुळे लहानग्यांच्या सुदृढ आराेग्याचा विचार करता कोविडदरम्यानही त्यांची जीवनशैली सुधारण्यावर भर दिला पाहिजे. जीवनशैलीतील मूलभूत बदलांमुळे या आजारांवर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होईल.

* लठ्ठपणाची कारणे

- ज्यांचे पालक किंवा परिवारातील सदस्य लठ्ठ असतील, त्यांच्यात लठ्ठपणा असण्याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट म्हणजे, आहार. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त (हाय कॅलरी फूड) सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत. मात्र, शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू लागते. लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरते.

- हल्ली लहान मुले टीव्ही आणि मोबाइल या गोष्टींमध्ये फार वेळ घालवतात. मैदानवर जाण्याचे आणि शारीरिक क्रिया करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आहे. याशिवाय लठ्ठपणाचे सर्वांत दुर्लक्षित कारण म्हणजे, हॉर्मोनल समस्या. शरीरात संप्रेरकांमुळे शरीरातील कार्याचे नियमन होते. त्यापैकी एक संप्रेरक म्हणजे ‘थायरॉइड हॉर्मोन’. हे संप्रेरक अतिरिक्त स्रवल्याने लठ्ठपणा आणि शरीरावर अनैसर्गिक सूज दिसू शकते.

-------------------------------------