सहव्याधीग्रस्तांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; कोरोना, इन्फ्ल्यूएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ

By स्नेहा मोरे | Published: March 28, 2023 07:54 PM2023-03-28T19:54:21+5:302023-03-28T19:54:27+5:30

राज्यासह मुंबईत कोरोनाबरोबरच आता इन्फ्ल्युएंजाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरांतील सरकारी

Increased risk of pneumonia in comorbidities; Increase in patients due to Corona, Influenza | सहव्याधीग्रस्तांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; कोरोना, इन्फ्ल्यूएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ

सहव्याधीग्रस्तांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; कोरोना, इन्फ्ल्यूएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ

googlenewsNext

मुंबई :

राज्यासह मुंबईत कोरोनाबरोबरच आता इन्फ्ल्युएंजाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरांतील सरकारी, पालिका रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागांत रुग्णांची संख्या वाढली आहे. तर, दुसरीकडे कोरोना, इन्फ्ल्युएंजामुळे सहव्याधीग्रस्तांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. गेल्या काही दिवसांत मधुमेह, अस्थमा, मूत्रपिंडविकार आणि श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांना न्यूमोनियाचे निदान होत असल्याची माहिती सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

गेल्या काही दिवसांत सहव्याधीग्रस्तांमध्ये आढळून येणारी तापसदृश लक्षणे ही न्यूमोनियाची आहेत. त्यात साठहून अधिक वय असणाऱ्यांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण अधिक आहे. याखेरीज, फुफ्फुसाच्या आजाराचा इतिहास असेल, तर हा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. जिवाणूंमुळे होणारा न्यूमोनिया दोन ते चार आठवडय़ांत बरा होतो. पण, विषाणूंमुळे होणारा न्यूमोनिया बरा होण्यास वेळ लागतो. त्यात ‘न्यूमोकोकल न्यूमोनिया’ हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी होऊ शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो, त्यामुळे लवकर निदान झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य होते, अशी माहिती गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे फुफ्फुसविकार विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ पुजारी यांनी दिली.

खासगीमध्ये तुलनेत कमी रुग्ण
सरकारी, पालिका रुग्णालयांमध्ये सहव्याधीग्रस्तांमध्ये न्यूमोनियाची लागण होण्याचे प्रमाण ८-१० टक्क्यांनी वाढले आहे. बऱ्याचदा ताप, खोकल्याकडे लक्षणे म्हणून दुर्लक्ष केल्याने आजार वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. पालिका रुग्णालयांमध्ये मुंबई परिमंडळातील रुग्ण येतात, यात ज्येष्ठांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण अधिक असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांनी सांगितले. तर खासगी रुग्णालयात या रुग्णांमध्ये अत्यल्प वाढ असून, हे प्रमाण पाच टक्के असल्याचे बॉम्बे रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाच्या न्यूमोनियाची लक्षणे दिसून येत असल्याचे डॉ. भन्साळी यांनी स्पष्ट केले.

तीव्र लक्षणे असतील तरच एच३ एन२ ची चाचणी
तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचीच एच३ एन२ विषाणूची चाचणी करण्यात येत आहे. रुग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये सरसकट इन्फ्ल्युएंजासदृश लक्षणे असतात. मात्र त्यातील लक्षणांचे वर्गीकरण करून या विषाणूची चाचणी करण्यात येत आहे. त्याकरिता केंद्र व राज्याने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कऱण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मास्कची सवय सुटल्याने वाढला धोका
कोरोना काळात व त्यानंतर मास्क घातल्याने श्वसनविकारांचा धोका कमी झाला होता. परंतु, त्यानंतर आता मास्क घालणे बंद केल्यामुळे या आजारासंबंधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे लोकल प्रवास, मॅलमधील गर्दी, थिएटर अशा बंद वा वर्दळीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्यावर भर द्यावा.

इन्फ्ल्युएंजा लसीविषयी जनजागृतीचा अभाव
इन्फ्ल्युएंजा लसीबाबत रुग्णांमध्ये उदासीनता दिसते. अनेकांना अशा स्वरुपाची लस असल्याचे माहिती नाही, वा त्याबद्दल अनेक गैरसमज बाळगून आहेत. न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोकोकल या दोन लसी आहेत. इन्फ्लुएन्झा लस प्रत्येकवर्षी, तर न्यूमोकोकल लस पाच वर्षांतून एकदा दिली जाते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांनी आणि बालकांनी ही लस घेणे गरजेचे आहे. न्यूमोनिया प्रतिबंधक लस टोचल्यास शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. मात्र, या लसींबाबत नागरिकांनाच माहिती नसल्याने लस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.

सहव्याधीग्रस्तांमध्ये दिसणाऱ्या न्यूमोनियासदृश वा न्यूमोनिया रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. ज्यांचा आजार प्राथमिक टप्प्यात आहे, तो नियंत्रण करणे शक्य होते. परंतु, उशिरा निदान होणाऱ्या न्युमोनियामध्ये गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे सध्याच्या काळात कोणतीही लक्षणे अंगावर न काढता तातडीने सल्ला घेणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रीती मेश्राम, श्वसन औषध विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय.

Web Title: Increased risk of pneumonia in comorbidities; Increase in patients due to Corona, Influenza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.