मुंबई : कोरोना झाल्यानंतरही ५० वर्षांच्या पुढे असणाऱ्या आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीला अधिक धोका असल्याचे तसेच अन्य आजारांचा धाेका वाढत असल्याचे एका अभ्यासात समाेर आले. त्यामुळे कोरोनाच्या उपचारादरम्यान आणि त्यानंतरही रुग्णाच्या शरीरातील रक्त, ऑक्सिजनची पातळी कायम तपासण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, कोरोना झालेल्या ६०-७० टक्के रुग्णांना वेगवेगळ्या ह्रदयविकारांचा धोका असतो. त्याचप्रमाणे, पूर्वीपासून अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय, रक्ताच्या गुठळ्यांचाही आजार होऊ शकतो. मुंबईत पालिकेच्या सायन, केईएम आणि नायर रुग्णालयांत पोस्ट कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे, तर खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात हे प्रमाण १२ टक्के इतके आहे.
नायर रुग्णालयाच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये दिवसाला जवळपास १० ते १२ रुग्ण येतात, या विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि स्थूलपणा यांसारखे आजार असणारे रुग्ण अधिक आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
दररोज १५ ते २० रूग्ण पोस्ट कोविड ओपीडीमध्ये येतात. ऑक्टोबरमध्ये १३८ रूग्णांनी उपचार घेतले. यात महिलांचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असून पुरूषांचे प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. यामध्ये ४० ते ६० वयोगटातील रूग्ण अधिक आहेत.- डाॅ. रमेश भारमल, नायर रूग्णालय, अधिष्ष्ठातात