लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये १० रुपयांनी घट करण्यात आली. मागील काही महिन्यांमध्ये इंधन व गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्या तुलनेत ही १० रुपयांची घट म्हणजे अत्यंत हास्यास्पद असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मागील काही महिन्यांमध्ये तब्बल २२५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींना चिंता सतावू लागली आहे. महागाई अजून किती रडविणार आणि प्रशासन ही महागाई कमी करण्यासाठी काही पावले उचलणार आहे का, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. २०२० च्या नोव्हेंबरमध्ये गॅस सिलिंडरचा दर ५९४ रुपये होता. मार्च महिन्यापर्यंत गॅस सिलिंडरचे दर थेट ८१९ रुपयांपर्यंत पोहोचले. १ एप्रिल रोजी गॅस सिलिंडरच्या दरात दहा रुपयांनी कपात केल्यामुळे ही स्वस्ताई केवळ नावालाच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
* सुगंधा भोसले - कोरोनामुळे घरातील बजेटचे कंबरडे मोडले आहे. त्यात महागाईमुळे कुठलाच खर्च परवडत नाही. इंधन, गॅस, भाज्या, कपडे सर्वांचेच दर वाढल्यामुळे आता नेमका संसार चालवायचा कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने गॅस सिलिंडरचे दर कमी करून सामान्यांना दिलासा द्यायला हवा.
* मीनाक्षी ससाणे - कोरोनाच्या काळात महागाई वाढवून सरकार सर्वसामान्यांची अक्षरशः पिळवणूक करीत आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढविताना शंभर ते दीडशे रुपयांनी वाढवले जातात. मात्र दर कमी करण्याच्या वेळेस केवळ दहा रुपयांनी कमी केले जात आहेत. ही सर्वसामान्य नागरिकांची थट्टा आहे. सरकारने नागरिकांचा अंत पाहू नये.
* योगिता पाटील - आधीच मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिल येत आहे. त्यात सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत. यामुळे घरखर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती कमी करायला हव्यात.
असे वाढले दर (ग्राफ)
नोव्हेंबर २०२० - ५९४
डिसेंबर २०२० - ६४४
जानेवारी २०२१ - ६९४
फेब्रुवारी २०२१ - ७१९
मार्च २०२१ - ८१९
एप्रिल २०२१ - ८०९