Join us

'संजय राऊतांची सुरक्षा वाढवली, पण अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं सरकारला घेणंदेणं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 1:37 PM

अनधिकृत फेरीवाले हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण, त्यांची बोटं छाटली जातात पण अधिकाऱ्यांच्या संरक्षणाचं ठाकरे सरकारला घेणंदेणं नाही.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यात राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे निवासस्थान आणि सामनाच्या कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबई - भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेनंतर राणे आणि शिवसेनेमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका विधानावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत सापडतील तिथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला. निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निलेश राणेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

गेल्या काही महिन्यात राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे निवासस्थान आणि सामनाच्या कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी सहा शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यावरुन, निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मराठी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं सरकारला काही घेणंदेणं नाही, असे राणेंनी म्हटलंय. 

अनधिकृत फेरीवाले हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण, त्यांची बोटं छाटली जातात पण अधिकाऱ्यांच्या संरक्षणाचं ठाकरे सरकारला घेणंदेणं नाही. पण संज्या जो मार खायच्या लायकीचा आहे त्याचं संरक्षण वाढवलं. शिवसेनेच्या खास लोकांनाच सत्तेचा फायदा, सामान्य शिवसैनिक फटके खातो, असे ट्विट निलेश राणेंनी केलंय. 

निलेश राणेंनी ठाण्यातील सहआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनाधिकृत फेरीवाल्याकडून झालेल्या हल्ल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेतली. ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्याचा आरोप करत त्या प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांनी ठाणेकर नागरिकांनाही जबाबदार मानले आहे. तर हा हल्ला दुदैवी असून पिंपळे यांचे दैवत चांगले तसेच आईवडिलांच्या आशीर्वादामुळे त्या बचावल्या. याशिवाय ही घटना ठाण्याला भूषणावह नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाठाणेनिलेश राणे