कोविड ड्युटीमुळे निवासी डॉक्टरांवर वाढताेय ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:03 AM2021-03-31T07:03:27+5:302021-03-31T07:06:00+5:30
मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालय व पालिका रुग्णालय-महाविद्यालयातील जवळपास सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित केल्याचे चित्र आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालय व पालिका रुग्णालय-महाविद्यालयातील जवळपास सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित केल्याचे चित्र आहे. शस्त्रक्रिया आणि इतर साधारण संदर्भातील रुग्ण घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. उपस्थित निवासी डॉक्टरांना कोविड केअर सेंटरमध्ये ड्यूटी लावली जात असल्याने त्यांचा ताण वाढत आहे, तर होणारे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मागील वर्षभरापासून कोविडचा प्रसार वाढला आहे. त्यात मार्च २०२० मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईतच नव्हे, तर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्राणाची बाजी लावत कोरोना रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या या कार्याचे राज्य शासनानेही कौतुकही केले. परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने पुन्हा कोरोना कक्षात ड्यूटी करण्याची जबाबदारी निवासी डॉक्टरांवर येऊन पडली आहे. कोरोना काळात ड्यूटी करण्यास निवासी डॉक्टरांनी विरोध केला नाही.
परंतु त्यांच्या विशेष विषयांचा अभ्यासक्रम शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक सराव अधिक बाबींचा अभ्यास कधी करणार, असा प्रश्न निवासी डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे.
मार्ड संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्षात तीन वर्षांपैकी दोन वर्षे कोरोनाचे रुग्णांवर उपचार करण्यात गेले, तर विशेष विषयाचा अभ्यास कधी करायचा. जवळपास दोन वर्षांपासून विद्यार्थी त्यांच्या विशेष विषयाचे अभ्यासापासून दूर गेले आहेत. त्यामुळे करिअर धोक्यात आले आहे. सुरुवातीला कोविड काळात रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा सुरू आहे.
कोरोना ड्युटीला नकार नाही, मात्र....
गेल्या वर्षांपासून ते आता कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्याविरोधात लढण्यासाठी पुन्हा निवासी डॉक्टर सज्ज झाले आहेत. मात्र, गेला वर्षभराचा काळ आणि आता वाढत असलेली कोरोनाची साथ ही स्थिती लगेच कमी होणारी नसल्याने मोठा कालावधी लागेल. यात डॉक्टरांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते आहे. याविषयी, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला विनंतीही करण्यात आली होती, परंतु त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता आमच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करण्यात यावा.
- डॉ. आबासाहेब तिडके, सचिव, सेंट्रल मार्ड
मागील वर्षभरापासून निवासी डॉक्टर अहोरात्र कोरोना कक्षात राबत आहेत. यात बरेच जण घरापासून दूर राहून वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. अशा स्थितीत आता पुन्हा कोरोना वाढत असल्याने नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यल्प प्रमाणावर आले आहे. त्यामुळे या निवासी डॉक्टरांना शिक्षण-प्रात्यक्षिकांच्या या शाखेपासून वंचित राहावे लागते. परिणामी यामुळे निवासी डॉक्टरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्य शासनाने ही बाब लक्षात घेऊन त्याविषयी निर्णय घ्यावा ही मागणी आहे.
- डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटी, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड