अंबरनाथ : पालिकेची सर्व यंत्रणा ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु करण्यात आली आहेत. शहरात अनेक चाळींची कामे सुरु असून या चाळींची खरेदीविक्रीही जोरात सुरु आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक असतांनाही हे पथक या बांधकामांकडे दुर्लक्ष करित आहे. निवडणुकीच्या काळात शहरात शासकीय आणि खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात येतात. याची कल्पना असतांनाही अंबरनाथ पालिकेने या बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या जागेवर नव्याने व्यापारी गाळे अनधिकृतरित्या उभारण्यात येत आहेत. रस्त्याच्या जागेवरुन आधीच वाद असतांनाही हे गाळे उभारले जात आहे. अशीच स्थिती लादीनाका पेट्रोल पंपावर आहे. पंपाच्या शेजारीच पत्र्याची खोली उभारुन या खोलीच्या आत विटांचे बांधकाम करुन नव्याने गाळे उभारण्यात येत आहेत. ह्या दोन्ही जागा कल्याण-बदलापूर महामार्गामध्ये जात आहे. असे असतांनाही या बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे. अशीच स्थिती बिग सिनेमाच्या समोर देखील आहे. येथेही मोठ्या प्रमाणात पालिकेच्या जागेवर बांधकामे उभारण्यात येत आहे.व्यापारी गाळ्यांसोबतच शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत घरे आणि चाळींची कामे सुरु आहेत. जावसई गांव, फुलेनगर,मोरिवली, बुवापाडा, भास्कर नगर, खामकर वाडी, चिंचपाडा, हरीओम पार्क, शिवाजीनगर, बारकुपाडा आणि चिखलोली गांव परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. पालिकेतील अतिक्रमण विभागाला या सर्व अनधिकृत बांधकामांची कल्पना असून ते या सर्व त्याकडे काणाडोळा करीत आहेत. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ
By admin | Published: April 10, 2015 12:19 AM