Join us

व्हायरल सर्दी-तापात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:11 AM

मुंबई - अलीकडच्या काळात साथीच्या तापाचे प्रमाण वाढत आहे. व्हायरल फिव्हरचा प्रादुर्भाव मुख्यतः पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आणि जागोजागी ...

मुंबई - अलीकडच्या काळात साथीच्या तापाचे प्रमाण वाढत आहे. व्हायरल फिव्हरचा प्रादुर्भाव मुख्यतः पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आणि जागोजागी पाण्याचे साठे वाढल्याने कीटकांची वाढ होताना दिसते. जे व्हायरल तापाच्या संक्रमणाकरिता जबाबदार ठरतात. मागील काही दिवसांत दवाखान्यात आणि रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात व्हायरलचे रुग्ण वाढले असून, त्यात लहानग्यांचे प्रमाण अधिक आहे.

कोविड संसर्गाची संख्या कमी झाली असली तरी मुंबई शहरात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे, डॉक्टरांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा आणि स्वत:चे उपचार टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरात शेकडो विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची नोंद होते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या मर्यादित होती; परंतु यावर्षी निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिकांचा प्रवास वाढला आहे, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यासह व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

फ्लू ताप आणि कोविड हे वैद्यकीयदृष्ट्या ओळखणे कठीण आहे. त्यामुळे, सर्व संशयित फ्लू रुग्णांसाठी आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचणी सुचविली जात आहे, असे एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. फिव्हर दवाखान्यातील डॉक्टरांना फ्लूच्या रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, त्यांचा घरगुती आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या इतिहासासह ते कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत का, याची तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

या उपाययोजना करा...

घरातील आणि सभोवतालच्या जागांमधील साचलेल्या पाण्याचे साठे नष्ट करावेत.

वेळोवेळी राहत्या जागेमध्ये, कॉलनीमध्ये रसायनांची फवारणी करावी. ज्यामुळे कीटकांचा, डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

२-३ दिवसांत मुख्य लक्षणांमध्ये सुधारणा न दिसल्यास, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन, योग्य तपासण्या करणे गरजेचे आहे.

सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या तापाविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हात धुण्याची सवय लावावी.

तापादरम्यान शरीराला विश्रांती देणे गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेणे टाळावं.

...तरीही वेगळे राहा

अंगात कणकण, अंगदुखी, ताप येणे, सर्दी अशी लक्षणे दिसल्यास त्वरित इतरांपासून स्वतःला वेगळे करा. जोपर्यंत तापाचे निश्चित निदान होत नाही, तोपर्यंत कुटुंबासोबतचा थेट संपर्क टाळा. आलेला ताप हा कोरोनाचा ताप नाही हे निदान झाल्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घ्या, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.