‘भातसा’तील पाणीसाठ्यात वाढ

By admin | Published: July 11, 2016 02:03 AM2016-07-11T02:03:22+5:302016-07-11T02:03:22+5:30

जिल्ह्यात रविवारी पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरी व ग्रामीण भागांत पाऊस पडलेला असतानाच धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे

Increased water storage in 'Bhattsa' | ‘भातसा’तील पाणीसाठ्यात वाढ

‘भातसा’तील पाणीसाठ्यात वाढ

Next


ठाणे : जिल्ह्यात रविवारी पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरी व ग्रामीण भागांत पाऊस पडलेला असतानाच धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे.
संततधार सुरू असल्यामुळे भातसा धरणात ४२०.८६ (४४.६७ टक्के) दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. तसेच इतर धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत असून जिल्ह्यात १७ छोट्या धरणांपैकी सात धरणे भरली आहेत.
मुंबई, ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या धरणांमध्ये आजपर्यंत २६ ते ४४ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात केवळ १५.२१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील या मोठ्या धरणांमध्ये मागील २४ तासांत ५१०.८० मिमी पाऊस पडला आहे. संततधार सुरू असलेल्या या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे.
भातसातील ४४.६७ टक्के या सर्वाधिक पाणीसाठ्याप्रमाणेच बारवी धरणात ६५.७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. सूर्याच्या धामणीत ४१.३८ टक्के, वांद्रीत ४४.३२, मोडकसागर २६.७८, तानसात ३८.०९ टक्के पाणीसाठा या धरणांमध्ये झाला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या १७ धरणांपैकी सात धरणे भरली आहेत. यामध्ये डोळखांब धरणाप्रमाणेच आदिवली, जांभुर्डे, भोज, जांभिवली, धसई आणि पाडाळे ही लहान धरणे भरली आहेत. त्यातील पाण्याचा वाढीव साठा सांडव्यातून वाहून जात आहे. (प्रतिनिधी)
कल्याण : ठाकुर्ली-चोळेगाव परिसरात राहणाऱ्या कुणाल ऊर्फ सनी लाड (१९) या तरुणाचा हेदुटणे परिसरातील नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी मित्रांसमवेत हेदुटणे येथील नदीवर फिरायला गेलेला कुणाल शनिवारी सायंकाळी नदीत बुडाला. त्याला इतर मित्रांकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती डोंबिवली विभागातील एमआयडीसी अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अखेर, रविवारी सायंकाळी कुणालचा मृतदेह शोधण्यात जवानांना यश आले. ठाकुर्ली पूर्वेकडील साईधाम इमारतीत राहणारा कुणाल हा मंजुनाथ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात शिकत होता.
ठाणे : शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे, तर रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. उल्हासनगर येथील वालधुनी नदीत पाय धुण्यासाठी उतरलेला रिक्षावाला वाहून गेला, तर कल्याणमध्ये एक मुलगा बुडाला असून ट्रकवर माळशेज घाटात दरड कोसळून चालक ठार झाला.
शहरात गॅसगळतीची घटना वेळीच लक्षात आल्याने त्यावर तत्काळ उपाययोजना केल्यामुळे अनर्थ टळला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तीन वृक्ष उन्मळून पडले, तर काही मोठ्या वृक्षांच्या फांद्या तुटल्या. एक भिंत पडली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कोपरी परिसरात खाडीकिनाऱ्याजवळील काही घरांमध्ये सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटांमुळे पाणी शिरले. येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार असून कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
खाडीकिनारीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे. जिल्ह्यात २८९.५२ मिमी पाऊस पडला असून सरासरी ४१.३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ जून २०१६ पासून आतापर्यंत सहा हजार १२७.७१ मिमी पाऊस पडला असून सरासरी ८७५.३९ मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी ३०० मिमी जादा पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Increased water storage in 'Bhattsa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.