मानवनिर्मित पाणथळचे वाढते प्रमाण धोकादायक; तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 10:45 AM2024-02-08T10:45:03+5:302024-02-08T10:47:14+5:30
भारतातील सहा टक्के लोकसंख्या ही पाणथळ जागांवर अवलंबून आहेत. १९७० पासून जवळपास ३५ टक्के पाणथळ जागा नष्ट झाल्या आहेत.
मुंबई : भारतातील सहा टक्के लोकसंख्या ही पाणथळ जागांवर अवलंबून आहेत. १९७० पासून जवळपास ३५ टक्के पाणथळ जागा नष्ट झाल्या आहेत. भारतातील नैसर्गिक पाणथळ जागा कमी होत आहेत; परंतु, मानवनिर्मित पाणथळ जागांचे प्रमाण वाढत आहे, हे धोक्याचे आहे, असे मत जागतिक पाणथळ भूमी दक्षिण आशियाचे संचालक डॉ. रितेश कुमार यांनी व्यक्त केले.
जागतिक पाणथळभूमी दिनाचे औचित्य साधत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात ग्रीन नॅनोटेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे पर्यावरण दक्षता मंडळ, मुंबई विद्यापीठ, एनव्हीरो-व्हिजिल आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस यांच्या वतीने मानवी कल्याणासाठी पाणथळ भूमी या संकल्पनेच्या अनुषंगाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रितेश कुमार बोलत होते. व्यासपीठावर यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाचे डॉ. नंदकुमार जोशी, मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ शास्त्र शाखेचे प्रमुख डॉ. शिवराम गर्जे उपस्थित होते.
पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद कर्णिक यांनी परिषदेचे महत्त्व विशद केले. स्वच्छ खाडी अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण दक्षता मंडळ गेले अनेक वर्ष ठाणे खाडीचा शास्त्रीय अभ्यास करत आहे.
विद्यापीठातील झाडांना क्यूआर कोड :
मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागप्रमुख डॉ. अपर्णा फडके यांनी सांगितले, मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील झाडांना क्यूआर कोड लावले आहेत.
त्यामुळे त्या झाडांचे नाव व संबंधित माहिती मिळते.
याच परिसरात पाणी पुनर्चक्रीकरण प्रकल्प, खत प्रकल्प आहे. मुंबई विद्यापीठ कार्बन कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे.