- मनोहर कुंभेजकर
मुंबई - उत्तर मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी नुकतेच शताब्दी आणि हरिलाल भगवती रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहाणी करून रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाच्या गलथान कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या, तसेच दहिसरचे हरिलाल भगवती रुग्णालय बंद असल्यामुळे रुग्णांचे गैरसोय होऊ लागली होती. या तक्रारींची दखल घेत पीयूष गोयल यांनी नुकतीच या रुग्णालयांना भेट दिली.
काही दिवसांपासून कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातील उपकरणे नादुरूस्त असणे, शस्त्रक्रिया विभाग (ओटीची) सेवा बंद असणे तसेच औषध उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी वारंवार नागरिकांकडून केल्या जात होत्या. गोयल यांनी सर्वप्रथम रुग्णांची चौकशी केली. पुढे त्यांनी रुग्णालायातील तपासणी यंत्रणा, वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष आदींना भेट दिली तसेच वैद्यकीय उपकरणे, साहित्य यांची तपासणी केली. तसेच डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासोबत रुग्णालयाच्या कामाकाजाची माहिती घेतली. रुग्णालय अधिक सक्षम होण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, याबाबत रुग्णालय व्यवस्थापक मंडळ, डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. यासह सध्या रुग्णालयाला येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आणि रुग्णांना योग सेवा मिळावी यासाठी पूर्णत: प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
हरिलाल भगवती रुग्णालयाचे काम जलद गतीने करण्याचे निर्देशदहिसर भागात हरिलाल भगवती रुग्णालय असून, त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. मात्र या कामात दिरंगाई होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रुग्णांना उपचारासाठी लांब जावे लागते, यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. पुनर्बांधणीच्या कामात कोणत्या अडचणी येत आहेत हे समजून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहाणी केली. संपूर्ण रुग्णालयाचा आराखडा गोयल यांनी पाहिला. पुनर्बांधणीचे काम जलद गतीने व्हावे तसे त्याच्या गुणवत्तेत कोणतीही कमी नको, असे निर्देशही गोयल यांनी दिले.यावेळी दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी,उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.