गणपती बाप्पाच्या सोनपावलांना वाढती मागणी!; सार्वजनिक मंडळांत चढाओढ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:05 AM2018-09-07T06:05:27+5:302018-09-07T06:05:39+5:30
अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन सोनपावलांनी व्हावे, म्हणून मंडळांमध्ये चढाओढ लागली आहे. सोन्या-चांदीच्या पावलांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आशीर्वाद हातांनाही पसंती मिळत असल्याचे सुवर्णकार नाना वेदक यांनी सांगितले.
मुंबई : अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन सोनपावलांनी व्हावे, म्हणून मंडळांमध्ये चढाओढ लागली आहे. सोन्या-चांदीच्या पावलांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आशीर्वाद हातांनाही पसंती मिळत असल्याचे सुवर्णकार नाना वेदक यांनी सांगितले.
मुंबईतील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सोनपावले तयार करणाऱ्या नाना वेदक यांनी यंदा मंडळांत चढाओढ लागल्याचे सांगितले. ते म्हणाले, यंदा २५हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी चांदीपासून तयार केलेल्या आणि सोन्याचा वर्ख असलेल्या गणेशपावलांची आॅर्डर दिली आहे. मूर्तीच्या उंचीनुसार त्यावर बसविण्यात येणाºया पावलांचा आकार ठरतो. त्यानुसार पावलांची किंमत ठरते. सरासरी तीन ते पाच किलोग्रॅम वजनाची पावले तयार केली जातात. त्यात चांदीचे वजन अधिक असते. तर सोन्याचा मुलामा दिला जातो. तसेच आशीर्वाद हात तयार करण्यासाठी सुमारे दीड ते अडीच किलोग्रॅम चांदीचा वापर केला जातो. घरगुती गणपतीसाठी लागणारे दागिने छोटे असून ते सोन्यापासून तयार केले जातात. सार्वजनिक गणपतीचे दागिने आकाराने मोठे आहेत. पारंपरिक दागिन्यांना जास्त मागणी आहे. कंठी, सोनपठ्ठे, बिकबाळी, कडे यांना गणेश मंडळांची पसंती आहे. एक चांदीची कंठी तयार करण्यासाठी मंडळांकडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. तसेच उंदीर, गदा, कमरपट्टे यांचीही मंडळांकडून मागणी केली जात आहे. सोने आणि चांदीच्या मोदकाच्या प्रतिकृतीसाठी घरगुती आणि छोट्या आकाराच्या गणेशमूर्तींसाठी वाढती मागणी आहे.
लोकवर्गणी काढून मंडळांकडून दागिन्यांचा खर्च भागविला जात आहे. पीओपी किंवा शाडूच्या मूर्तीवर डोके ठेवल्याने किंवा हाताने स्पर्श केल्याने मूर्तीला नुकसान पोहोचण्याची भीती असते. याउलट सोनपावलांमुळे भक्तांना थेट बाप्पाच्या चरणावर माथा टेकविता येतो.
पुढील वर्षी ‘घोडपदेवचा राजा’ ८५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने बाप्पाला दोन चांदीची पावले तयार करण्याचा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लोकवर्गणीतून ही पावले घडविली जाणार आहेत. म्हणून कार्यकर्ते अधिकाधिक देणगीदारांना मदतीसाठी आवाहन करत आहेत. चांदीच्या पावलांमुळे आगमनापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक भाविकाला बाप्पाच्या चरणावर माथा टेकवून आशीर्वाद घेता येईल.
- राहुल विचारे, उपाध्यक्ष-घोडपदेव सार्वजनिक मंडळ