मुंबई - शहर-उपनगरात पावसाने दडी मारल्याने वातावरणातील बदल होतो आहे. या बदलांमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांमध्ये व्हायरलचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात मुंबईकरांनी वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जून महिन्यांत डेंग्यूसदृश्य आजारांचे एकूण २९७ रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल होत होते. तर जुलै महिन्यांत या डेंग्यूसदृश्य आजारांच्या रुग्णांत कमालीची वाढ झाली. ही संख्या थेट ९९५ च्या घरात पोहोचली होती. या रुग्णांवर औषधोपचार केले जातात. त्यामुळे सध्या पावसाचे कमी - अधिक झालेले प्रमाणही आजारांचे प्रमाण वाढवित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.याविषयी, फिजिशिअन डॉ. मोहीत राणावत यांनी सांगितले की, पावसाचा जोर कमी झाल्याने वातावरणात वेगाने बदल होतो आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या स्वास्थ्यावर बेतला आहे. अशा वेळी सर्वात आधी कोणतीही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला त्वरित घ्यावा. शिवाय, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, वैयक्तिक स्वच्छता पाळावी, पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत लहानग्यांना संसर्ग होण्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याकडेही अधिक सर्तकतेने लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
डेंग्यूसदृश्य तापांत वाढ, वातावरणातील बदलांमुळे व्हायरल वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 3:06 AM