वाढत्या इंधनदराचा एसटीला फटका, रोज १ कोटीचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:39 AM2018-09-25T05:39:34+5:302018-09-25T05:40:40+5:30

दिवसागणिक वाढत्या इंधनदरामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असताना याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे.

 Increasing fuel price sticks ST | वाढत्या इंधनदराचा एसटीला फटका, रोज १ कोटीचा भुर्दंड

वाढत्या इंधनदराचा एसटीला फटका, रोज १ कोटीचा भुर्दंड

Next

- महेश चेमटे
मुंबई  - दिवसागणिक वाढत्या इंधनदरामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असताना याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे. गेल्या सहा महिन्यांत इंधनाच्या किमतीमध्ये तब्बल ९ रुपयांनी वाढ झाल्याने एसटी महामंडळाला रोज एक कोटीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी प्रवासी भाडेवाढीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल २०१८मध्ये एसटी महामंडळ सरासरी ६३ रुपये ७६ पैसे प्रतिलीटर दराने डिझेल खरेदी करत होते. मात्र दरवाढीमुळे सप्टेंबरमध्ये एसटी महामंडळाला ७१ रुपये ८६ पैसे दराने डिझेल उपलब्ध होत आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत डिझेलच्या किमतीत सुमारे ९ रुपयांनी वाढ झाली. यामुळे महामंडळाला रोज सुमारे १ कोटीचा फटका बसत आहे. महामंडळाला वर्षाला सुमारे ३ हजार कोटींचा डिझेल खर्च येतो. हा खर्च महामंडळाच्या एकूण ३७ टक्के असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
शहरांपासून ते खेड्यांपर्यंत रोज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण १९ हजार बस धावतात. या बस मार्गस्थ राहण्यासाठी महामंडळातील २५० आगारांमध्ये रोज एकूण सुमारे १२ लाख १२ हजार ५०० लीटर डिझेल लागते. अशा प्रकारे दरवाढ कायम राहिल्यास खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
डिझेल दरवाढीची ही तूट भरून काढण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रवासी भाडेवाढ करण्याची चर्चा महामंडळात रंगत आहे. पुन्हा भाडेवाढ केल्यास त्याचा थेट ताण सर्वसामान्यांवर येण्याची शक्यता महामंडळातील वरिष्ठ अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत.

महिन्यातून दोनदा बदलतात दर

एसटी महामंडळ डिझेलचा घाऊक (होलसेल) खरेदीदार आहे. यामुळे महिन्यातून दोन वेळा इंधनाचा दर बदलण्यात येतो. इंधन दरांच्या चढ-उतारानुसार दरनिश्चिती होते. यामुळे इंधन दराच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाला साहजिकच भुर्दंड बसत आहे.

Web Title:  Increasing fuel price sticks ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.