आरेमध्ये कीटकांचा वाढता अधिवास; चतुर, टाचण्यांच्या ५२ प्रजाती आढळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:18 AM2020-01-28T05:18:38+5:302020-01-28T05:19:25+5:30
आरेमध्ये लोट्स पॉन्ट म्हणून ओळखली जाणारी जागा ही एक उथळ पाणवठा आहे. तिथे आरेतील रहिवासी गणेशमूर्ती किंवा निर्माल्य इत्यादी गोष्टी विसर्जित करतात.
- सागर नेवरेकर
मुंबई : आरे कॉलनीचे जंगल हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा थोडे वेगळे आहे. आरेमध्ये मानवी वस्ती तसेच काँक्रीटचे जंगल असून तिथे कीटकांचा अधिवास दिवसेंदिवस वाढत आहे, असे म्हणायला वावगे ठरणार नाही. आरे कॉलनीमधील न्यूझीलंड हॉस्टेलकडे जाताना वाटेत एक तलाव आहे. त्या तलावामध्ये आणि तलावाच्या आसपास चतुर व टाचण्यांच्या एकूण ५२ प्रजाती आढळून आल्या आहेत. या वेळी ‘ब्लॅक मार्श स्कीमर’ हा चतुर मुंबई उपनगरामध्ये पहिल्यांदा आढळून आला.
आरेमध्ये लोट्स पॉन्ट म्हणून ओळखली जाणारी जागा ही एक उथळ पाणवठा आहे. तिथे आरेतील रहिवासी गणेशमूर्ती किंवा निर्माल्य इत्यादी गोष्टी विसर्जित करतात. हा तलाव पावसाळ्यात भरतो आणि पावसाळ्यानंतर सुकून जातो. तलाव उथळ असल्यामुळे तिथे
खूप सारे गवत उगवते. तसेच तलावाच्या आजूबाजूला बरीचशी वड व पिंपळ अशी झाडे आढळून
येतात. आरेच्या तलावात आणि तलावाच्या आसपास चतुर व टाचण्यांच्या एकूण ५२ प्रजाती आढळून आल्या आहेत. याचा अभ्यास वन्यजीव संशोधक राजेश सानप यांच्यासह सलग दोन वर्षे केला, अशी माहिती केईएम रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्राचे कनिष्ठ निवासी डॉक्टर दत्तप्रसाद सावंत यांनी दिली.
संशोधनादरम्यान, ‘स्प्रेड विंग’ टाचण्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने आढळून आले. ज्याचे पंख उघडलेले असतात. कारण तलावातले गवत हे त्यांच्या प्रजननासाठी उपयुक्त
आहे. स्प्रेड विंग टाचण्यांचा कालावधी आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत
दिसून येत होता. ‘ब्लॅक मार्श ट्रॉटर’ नावाचा चतुर आहे. तो आॅगस्ट महिन्यानंतर मोठ्या संख्येने
दिसून आला. ‘ब्लॅक मार्श स्कीमर’
हा चतुर मुंबई उपनगरामध्ये
पहिल्यांदा आढळून आला. ‘गाँफिड’ कुळातील ‘कॉमन क्लबटेल’ हा
चतुर दिसून आला. बऱ्याच
चतुरांचे विविध पॅटर्न निदर्शनास आले, असेही भाष्य दत्तप्रसाद सावंत
यांनी केले.
तलावाची वैशिष्ट्ये : तलावाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता आणि काही झाडे आहेत. रस्ता आणि मानवी वस्ती असून अशा प्रकारच्या गजबजलेल्या ठिकाणी चतुर व टाचण्यांच्या ५२ प्रजाती सापडणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. याशिवाय या तलावात पाणकमळे आहेत. पाणकमळांच्या वेलींमध्ये चतुर अंडी घालतात. त्यामुळे या तलावात कीटकांचा वावर जास्त आहे. इतर ठिकाणी चार ते पाच प्रजाती दिसून येतात. दुर्दैव म्हणजे तलावाच्या पाण्यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती व निर्माल्य मोठ्या प्रमाणात टाकले जाते.