मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र, अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम असताना राज्यात आता डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे. गेल्या केवळ नऊ महिन्यात डेंग्यूचे ५ हजार ९४४ रुग्ण आढळले असून, तब्बल ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या डेंग्यू आणि चिकनगुनिया संसर्गामुळे राज्यातील साथरोग परिस्थिती चिघळत असल्याचे दिसते.
नागपूर जिल्ह्यात सहा तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, अहमदनगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला. गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभरात ३ हजार ३५६ रुग्ण होते, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. डेंग्यूसह चिकनगुनिया संसर्गदेखील डोके वर काढत असल्याचे दिसते. राज्यात चिकनगुनियाचे १ हजार ४४२ रुग्ण आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू मात्र झालेला नाही. गेल्या वर्षी फक्त ७८२ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीदेखील या संसर्गाने मृत्यू झाला नव्हता.
राज्यात आतापर्यंत मलेरियाच्या ९ हजार २८९ रुग्ण, तर २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मलेरियाचे १२ हजार ९०९ रुग्ण, तर १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारखे जलजन्य आजाराचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे वाढले असल्याचे दिसते. जलजन्य आजाराच्या १ हजार २१७ रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या वर्षी १ हजार १७४ रुग्णांना बाधा झाली होती. २०१८ मध्ये २ हजार २८९ तर २०१९ मध्ये १ हजार ५१० रुग्णांची नोंद झाली होती.