वातावरणातील बदलाने मुंबईतील किमान तापमानात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:15 AM2018-12-26T07:15:55+5:302018-12-26T07:16:49+5:30

मुंबई शहर आणि उपनगरावर धूलिकणांची चादर पसरली असतानाच, दुसरीकडे मुंबापुरीतल्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.

 Increasing the minimum temperature in Mumbai with the change in the atmosphere | वातावरणातील बदलाने मुंबईतील किमान तापमानात वाढ

वातावरणातील बदलाने मुंबईतील किमान तापमानात वाढ

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरावर धूलिकणांची चादर पसरली असतानाच, दुसरीकडे मुंबापुरीतल्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. १६ अंश नोंदविण्यात येणारे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात येत असून, गार हवेचा प्रभावही ओसरला आहे. परिणामी, मुंबई शहर आणि उपनगरातील थंडी कमी झाला असून, वातावरणातील बदलाचा हा परिणाम असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
२७ ते २९ डिसेंबरदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल. २६ ते २९ डिसेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. बुधवारसह गुरुवारी मुंबइचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

थंडीसह प्रदूषणाचाही मुंबईकरांना ताप


मुंबई : गेल्या काही दिवसांत शहर-उपनगरातील वातावरणात खूप बदल होत आहेत. दुसरीकडे प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. तापमानात सतत होणारे चढउतार, धुरक्यांचे वाढते प्रमाण, यामुळे मुंबईकर आजारी पडले आहेत.
शरीरातील पाणी, क्षार कमी होण्यापासून ते ‘अ‍ॅलर्जी’मुळे होणाऱ्या श्वसनमार्गाच्या विविध आजारांमुळे सध्या मुंबईकर त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास अशा अनेक तक्रारी रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
प्रदूषणामुळे धुरक्यांचा त्रास होत असल्याने, श्वसनाशी निगडित तक्रारी आढळून येत आहेत. वयस्कर मधुमेही रुग्णांमध्ये शरीरातील क्षारांचे म्हणजे सोडियमचे प्रमाण कमी होण्याची तक्रार आहे. एरव्ही ही समस्या त्यांना एप्रिल-मे मध्ये जाणवते. सोडियम कमी झाल्यामुळे एकाग्रता कमी होणे, अधिक बोलणे किंवा एकदम शांत राहणे असे बदल दिसून येतात, अशी माहिती फिजिशिअन डॉ.डेव्हिड केणी यांनी दिली. थंडीतही डिहायड्रेशन होऊ शकते. ऋतुबदलामुळेही त्वचेच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे डॉ. शौनक उपासनी यांनी सांगितले. ते म्हणाले, सर्दी, टाळूच्या वरच्या बाजूस खाज येणे, घसा खवखवणे आदी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत.

थंडी सुरू झाली की, आजी-आजोबांबरोबर आता तरुण पिढीची हाडेही कुरकुरायला लागली आहेत. तरुण वयातच अनेकांना सांधेदुखी वगैरेचा त्रास सुरू झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलती आहारपद्धती. मुळात, हाडांचे आरोग्य पौष्टिक आहारावर अवलंबून असते, हेच आपल्याला ठाऊक नसते. अस्थिरोगांची कारणे गुंतागुंतीची असतात, पण तरीही बरेचसे अस्थिरोग निर्माण होण्याची शक्यता व्यवस्थित पोषक आहार घेतल्याने कमी होऊ शकते.
- डॉ. श्रीशा सोनावणे, अस्थिरोगतज्ज्ञ

Web Title:  Increasing the minimum temperature in Mumbai with the change in the atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान