वर्सोव्यात तिवरांवर संकट, खारफुटीची कत्तल करून अनधिकृत झोपड्यांची वाढती संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:24 AM2018-11-05T04:24:41+5:302018-11-05T04:24:54+5:30

वर्सोवा येथील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, म्हाडा, धनलक्ष्मी कौ. आॅप-हौ. सोसायटी समोर, एसव्हीपी नगर, चार बंगला आणि मिल्लत नगर येथे मोठ्या प्रमाणात तिवरांचे जंगल अस्तित्वात आहे.

Increasing number of unauthorized hamlets by conspiring to kill Kharsfuti in Varsova | वर्सोव्यात तिवरांवर संकट, खारफुटीची कत्तल करून अनधिकृत झोपड्यांची वाढती संख्या

वर्सोव्यात तिवरांवर संकट, खारफुटीची कत्तल करून अनधिकृत झोपड्यांची वाढती संख्या

Next

- सागर नेवरेकर
मुंबई  - वर्सोवा येथील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, म्हाडा, धनलक्ष्मी कौ. आॅप-हौ. सोसायटी समोर, एसव्हीपी नगर, चार बंगला आणि मिल्लत नगर येथे मोठ्या प्रमाणात तिवरांचे जंगल अस्तित्वात आहे. मात्र, येथील काही भू माफियांनी तिवरांच्या जंगलात भराव टाकून अनधिकृत झोपड्या बांधून विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याबाबत, जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठान संस्थेने तहसिलदारांकडे वारंवार तक्रार व पाठपुरावा करुन त्यांना सदर जागेचा पंचनामा करण्यास भाग पाडले. या विभागाने केलेल्या पंचनाम्यामध्ये या परिसरात १२०० अनधिकृत झोपड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या सर्व झोपड्या कांदळवन परिसरात आहेत. त्यामुळे तिवरे नष्ट झाली असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे़
या ठिकाणी झोपडी बांधण्यासाठी सुनियोजितपणे कामे केली जात आहेत. सर्वप्रथम या परिसरातील कांदळवनावर डेब्रिज टाकून कांदळवनाचा परिसर नष्ट केला जात आहे. त्यामुळे, दिवसेंदिवस या परिसरातील अनधिकृत झोपड्यांची संख्या वाढत आहे. झोपड्यातून येणारे सांडपाणी आणि कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे.
एकीकडे वनविभागाकडून कांदळवन क्षेत्र वाचविण्याच्या मोहीम सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, वर्सोव्यात तिवरांची हानी सुरु असून परिसरात तिवरांच्या झाडांची कत्तलही केली जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी दोषींवर उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार १९८६च्या पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम १५ (१) (२) गुन्हा नोंद करुन कार्यवाही करण्यात यावी. अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करुन तिवरांच्या क्षेत्रात संरक्षण भिंत बांधून तिवरांच्या जंगलाचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठान संस्थेकडून करण्यात आली.
याबाबत, राज्याच्या कांदळवन विभागाचे अतिरिक्त वनअधिकारी एन. वासुदेवन यांनी सांगितले की, वर्सोव्यातील हा परिसर वनविभाग आणि म्हाडा या दोघांपैकी कोणाच्या अखत्यारित आहे, याची आधी माहिती घेण्यात येईल व ती जागा वनविभागाकडे असेल तर अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली जाईल. स्थानिक आमदार भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही़

अनधिकृत झोपड्यांना वीज आणि पाणी

वर्सोवा परिसरात तिवरांची कत्तल करून अनधिकृत झोपड्या बांधून झोपडपट्टी धारकांना वीज आणि पाणी पुरविले जाते. येथील समाज कंटक वीज आणि पाणी चोरून व्यवसाय करत आहेत. अंधेरी तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या पंचनाम्यानुसार भानु शेख, सलीम शेख, राजू धवसे, सुनील शिंदे, मनोहर सिंह, चिया चौहान, राजेश शर्मा हे आरोपी वीज आणि पाणी चोरून सरकारी महसूल बुडवून लाखो रुपयांचा दरमहा व्यवसाय करीत असल्याचे अंधेरी तहसिलदारांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच भूखंडाचे जी.पी.एस रीडींग ही करण्यात आले आहे.

गेल्या २ ते ३ वर्षांत वर्सोवा कवट्या खाडी, मिल्लत नगर मोगरा नाला ते अय्यपा मंदिर त्याच प्रमाणे एस.व्ही.पी. नगर म्हाडा सोआयटी क्रमांक १२ समोरील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड यांचा मालकीचा जागेवर अनधिकृत खारफुटीची जंगले कापून खाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. संस्थेने सतत संबंधित विभागास पाठपुरावा करून या सर्व बाबी समोर आणल्या. परंतु कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तलाठी व तहसीलदार यांचा गेल्या दोन वर्षांत केलेल्या पाच ते सहा सर्वेनुसार २०० ते २५० झोपड्या होत्या. मात्र, आॅक्टोबरच्या सर्वेनुसार झोपड्यांची संख्या तब्बल १२०० वर गेली आहे.
- संतोष सोनावणे,
अध्यक्ष, जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठान.
 

Web Title: Increasing number of unauthorized hamlets by conspiring to kill Kharsfuti in Varsova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई