महिलांमध्ये फुप्फुसांच्या कर्करोगाचा वाढता प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:05 AM2021-08-01T04:05:23+5:302021-08-01T04:05:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - जागतिक लंग कॅन्सर डेनिमित्त न्युबर्ग सेंटर फॉर जेनॉमिक मेडिसिनमधील लंग कॅन्सर डिटेक्शन हाऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - जागतिक लंग कॅन्सर डेनिमित्त न्युबर्ग सेंटर फॉर जेनॉमिक मेडिसिनमधील लंग कॅन्सर डिटेक्शन हाऊ लेट, इज लेट या विषयावरील पॅनल डिस्कशनमध्ये सध्या महिलांमध्ये फप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा निष्कर्ष नोंदवला गेला. पुरुषांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र, महिलांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण ही सध्या चिंतेची बाब ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते वजन घटणे, सतत थुंकी जमा होणे, कफ, खोकल्यातून रक्त पडणे ही फुप्फुसाच्या कर्करोगाची काही मुख्य लक्षणे आहेत. फुप्फुसांमधून कर्करोग एकदा पसरला की तो यकृतापर्यंत पोहोचून कावीळ होते आणि मूत्रपिंडाजवळील ग्रंथीमध्ये पसरून त्यांना निष्क्रिय करतो. त्यामुळे बीपी अत्यंत कमी होऊन आपातकालीन स्थिती निर्माण होणे, वेदना आणि हाडांना फ्रॅक्चर होणे आणि कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला की स्ट्रोक किंवा फिट येऊ शकते.
धूम्रपान, तंबाखू खाणे, खेणी, हुक्का, तंबाखू असलेले पान, रिव्हर्स स्मोकिंग, घरातील किंवा ट्रॅफिकमधील प्रदूषित घटक हे फुप्फुसाचा कर्करोग होण्यामागील मुख्य कारणे आहेत. शिवाय, कारखान्यात, खाणीत काम केल्यानेही हा आजार होऊ शकतो. या चर्चेत मांडलेल्या मुद्द्यांनुसार, येत्या काही वर्षांत भारतात तंबाखूशी संबंधित कारणांमुळे हा आजार होण्याचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
मेडिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. एस. विश्वनाथ म्हणाले फुप्फुसाच्या कर्करोगाला सुरुवातीच्या टप्प्यात क्षयरोग समजले जाते. कारण, या दोन्ही आजारांची लक्षणे बऱ्यापैकी सारखीच आहेत. दोन्हींमध्ये रुग्णाला खोकला किंवा खोकल्यासह रक्त पडण्याचा त्रास होतो. फुप्फुसाचा कर्करोग होण्यामागे धूम्रपान हे मुख्य कारण आहे. धूम्रपान करणारे आणि न करणारे यांच्यात फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका २०:०१ या प्रमाणात असतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीइतकाच त्यांच्या सानिध्यात असलेल्या म्हणजेच पॅसिव्ह स्मोकरनासुद्धा हा आजार होण्याचा धोका असतो. रुग्णाला सुरुवातीच्या टप्प्यात उपचार देताना अनेक रेडिओथेरपीमध्ये सर्जरीचा पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र, आता टारगेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यासारखे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत. यात एकूणच जीव वाचण्याची आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य मिळण्याची शक्यता अधिक असते. टारगेटेड आणि इम्युनोथेरपीमध्ये केमोथेरपीच्या तुलनेत साइड इफेक्ट्स कमी असतात. थेरपीचे पर्याय निवडण्यात जेनेटिक टेस्टिंगमुळे फार मदत झाली आहे आणि त्यातून रुग्ण वाचण्याचे प्रमाणही वाढले.
सर्जिकल आँकॉलॉजी डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, फुप्फुसाच्या कर्करोगाचे ५० टक्के रुग्ण निदानानंतर पहिल्या वर्षभरातच दगावतात. मात्र, कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर मृत्यूमध्ये १४-२०टक्के घट करू शकतो. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यातली लक्षणे फारशी दिसून येत नाहीत. ग्रामीण महिलांमध्ये रिव्हर्स स्मोकिंग हे फुप्फुसांचा कर्करोग होण्यामागील प्रमुख कारण ठरत आहे, सर्जिकल, मेडिकल, मोलिक्युलर पॅथॉलॉजिस्ट आणि जेनेटिक कौन्सुलर यांचा यात सहभाग असावा. टारगेटेड थेरपी आणि जेनेटिक टेस्टिंगमुळे रुग्णाचे वाचण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
टारगेटेड थेरपी ही अत्यंत महत्त्वाची
चीफ सायंटिस्ट आणि मोलिक्युवर आँकालॉजीचे डॉ. सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले कर्करोगाचे उपचार करण्यात टारगेटेड थेरपी ही एक अत्यंत महत्त्वाची पद्धत म्हणून उदयास आली आहे. केमोथेरपीमध्ये वेगाने विभाजन होणाऱ्या साधारण आणि कर्करोगाच्या अशा सर्व प्रकारच्या पेशींवर मारा केला जातो. ज्यात साधारण पेशीही मारल्या जातात, तर टारगेटेड थेरपीजमध्ये कर्करोगाशी संबंधित विशिष्ट मोलिक्युलरला लक्ष्य केले जाते. केमोथेरपीच्या तुलनेत टारगेटेड थेरपीचे साइडइफेक्ट्स कमी असतात आणि त्यामुळे रुग्णाच्या आयुष्याचा दर्जाही सुधारतो.
चौकट
रिव्हर्स स्मोकिंगमुळे महिलांमध्ये फुप्फुसांच्या कर्करोगाच्या वाढत्या घटना
८०-८५ टक्के रुग्ण आजाराच्या पुढच्या टप्प्यातच दखल घेतात.
कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपीला पर्याय म्हणून टारगेटेड टिश्यू थेरपीचा वापर वेगाने वाढत आहे.
कर्करोगाच्या पुढच्या टप्प्यातही जेनेटिक टेस्टिंगमुळे फुप्फुसांचा कर्करोग झालेल्या रुग्णांचे जीवनमान वर्षभरापासून ३-५ वर्षांपर्यंत वाढले.