लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. गरिबांना चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी हे दवाखाने सुरू केले आहेत. या दवाखान्यात १४८ मोफत रक्त चाचण्या, विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात. ‘लोकमत’नेदहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोकुळ आनंद हॉटेलसमोर शंकर लेन चाळ आणि कांदिवली (पूर्व) दामूनगर येथील ओटीस कंपाउंड येथील आपला दवाखान्याला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.
आपला दवाखाना रविवार आणि इतर सरकारी सुट्या वगळता दुपारी ३:०० ते रात्री १०:०० पर्यंत सुरू असतो. येथे रोज सुमारे ६० ते ७० कर्मचारी सायंकाळी उपचारासाठी येतात. येथील पोटा केबीनमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक नर्स, एक फर्मासिस्ट आणि एक मल्टिपर्पज वर्कर असा चार जणांचा स्टाफ आहे. तसेच पुरूष व महिलांसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाकडे, रक्तचाचणी आदी सुविधा आहेत. या ठिकाणी जास्तकरून रक्तदाब, डायबेटीस, हाडांचे विकार यांचे रुग्ण उपचारासाठी येतात. लवकरच येथे ईसीजी, सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दहिसर पूर्व केतकी पाडा आणि दहिसर पश्चिम स्टेशनसमोर वाय. आर. तावडे मार्ग येथेही आपला दवाखानाची सुविधा आहे. त्वचा, स्त्रीरोग, दंतचिकिस्ता, नेत्र चिकित्सा आदी रुग्णांना रावळपाडा आणि आनंदनगर पॉलिक्लिनिक येथे पाठविण्यात येते. - डॉ. प्रियांका सिंग, वैद्यकीय अधिकारी.
७ एप्रिलपासून येथे दवाखाना सुरू झाला. ४ जूनपूर्वी येथे रोज १५ ते २० रुग्ण येत होते. मात्र, आता येथे रोज ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी येतात. दुपारी ३:०० ते १०:०० पर्यंत आपला दवाखाना सुरू असतो. सायंकाळी ५:०० नंतर येथे रुग्णांची संख्या वाढते. जास्तकरून ३० वर्षांवरील रुग्णांमध्ये रक्तदाब, डायबेटीसचे रुग्ण आढळून येतात. लवकरच येथे रक्तचाचणी सुरू होणार आहे. - डॉ. मयांग शर्मा, वैद्यकीय अधिकारी.
१७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मागाठाणेत सुरू झालेल्या आपला दवाखानामुळे येथील नागरिकांची वेळेची आणि पैशांची बचत झाली आहे. येथील नागरिकांना आजार आणि सहव्याधीपासून प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी आपला दवाखाना हा उत्तम पर्याय आहे. येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सुविधांचा लाभ घ्यावा. - प्रकाश सुर्वे, आमदार.
आपला दवाखाना सुरू केल्याने आणि येथे मोफत उपचार मिळत असल्याने मोलमजुरी करणाऱ्या आमच्या गरिबांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी खासगी रुग्णालयात न जाता आपला दवाखाना या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा. - सुवर्णा कांबळे, रुग्ण, दामूनगर, कांदिवली (पूर्व).