Join us

राज्यात साथीच्या आजारांचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात आता साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूसह चिकुनगुनियाच्या आजाराने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात आता साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूसह चिकुनगुनियाच्या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या सात महिन्यांत डेंग्यूचे २,१६९ रुग्ण आढळले असून, चिकुनगुनियाचे ७५७ रुग्ण सापडले आहेत. या दोन्ही आजारांचे पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूरमध्ये अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात डेंग्यूचे यंदा जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत २,१६९ रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १२३, नागपूरला १४०, वर्धा जिल्ह्यात ९८, नाशिकमध्ये ९५ आणि यवतमाळ जिल्ह्यात ८३ रुग्ण आढळले आहेत. या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले, तर मलेरियाचे आतापर्यंत ६,३४८ रुग्ण आढळले असून, गडचिरोली, मुंबई, गोंदिया, ठाणे, चंद्रपूर जिल्ह्यांत याचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

राज्यात चिकुनगुनियाचे ७५७ रुग्ण आढळले असून, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे अधिक रुग्णसंख्या आहे. ‘लेप्टोस्पायरोसिस’चे सर्वाधिक रुग्ण मुंबई विभागात आढळले. मुंबईत ८८, सिंधुदुर्ग ३५१, रायगड २९, ठाणे शहरात दोन जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांत मुंबईत मलेरियाचे २०१, डेंग्यूचे ३२, लेप्टोचे १५, गॅस्ट्रो ८६, हिपेटायटिस ७ आणि ‘एच१ एन१’चे ५ रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

तपासण्या : कोणाचे, किती महत्त्व?

डेंग्यूची काही खास लक्षणे/चिन्हे यामुळे डॉक्टरांना डेंग्यूची शंका येते. सोबत एन. एस. १ ही रक्त-तपासणी पहिल्या पाच दिवसांत केली तर डेंग्यूचे पक्के निदान होते. पाचव्या दिवसानंतर दुसऱ्या दोन रक्त-तपासण्यांतूनही डेंग्यूचे नेमके निदान होते. तापाच्या सरसकट सर्व रुग्णांमध्ये या तपासण्या करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा ‘हिमोग्राम’ ही साधी रक्त-चाचणी जास्त उपयोगी आहे. त्यातून विषाणू-ताप, जिवाणू ताप व मलेरिया यापैकी काय आहे हे कळायला मदत होते. शिवाय ‘हिमोग्राम’मध्ये आढळले की हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढले आहे, तसेच रक्तातील प्लेटलेट्सची संख्या दर मिलिलीटरमागे एक लाखांपेक्षा खाली गेली आहे तर ‘गुंतागुंतीचा डेंग्यू’ आहे, असे म्हणता येते.

लक्षणे

डेंग्यू हा विशिष्ट प्रकारच्या (एडिस इजिप्त) डासामार्फत पसरणारा एक प्रकारचा विषाणू ताप आहे. त्याचे दोन उपप्रकार आहेत. साधा डेंग्यू व ‘गुंतागुंतीचा डेंग्यू’. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, त्याभोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची लक्षणे आहेत.