तरुणांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका

By admin | Published: April 12, 2015 01:01 AM2015-04-12T01:01:00+5:302015-04-12T01:01:00+5:30

झी मराठीवरील प्रसिद्ध ‘जय मल्हार’ मालिकेतील प्रधानजीची भूमिका करणारा तरणाबांड कलावंत अतुल अभ्यंकर याचा एकाएकी हृदयविकाराने मृत्यू झाला.

Increasing risk of heart disease among young people | तरुणांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका

तरुणांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका

Next

संकेत सातोपे ल्ल मुंबई
झी मराठीवरील प्रसिद्ध ‘जय मल्हार’ मालिकेतील प्रधानजीची भूमिका करणारा तरणाबांड कलावंत अतुल अभ्यंकर याचा एकाएकी हृदयविकाराने मृत्यू झाला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे धावताना अचानक छातीत कळ आली आणि फुटबॉलपटू असलेला महाविद्यालयीन तरुण दगावला. व्यायाम करता करता हृदय बंद पडून तरुण पत्रकार मृत्युमुखी पडला. गेल्या काही दिवसांतील अशा प्रकारांमुळे तरुणांतील वाढत्या हृदयरोगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यसनाधीनता, जंकफूड आणि व्यायामाचा अभाव हीच यामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तरुणांमध्ये वाढणारा हृदयरोग ही विशेषत: महानगरी जीवनातील मोठी समस्या आहे. त्यापासून बचावासाठी तरुणाईने दारू - सिगरेटसारख्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. व्यायामादरम्यान हृदय बंद पडून मृत्यू झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या असल्या, तरीही व्यायाम त्याला कारणीभूत नाही. मुळात हृदयविकाराचा धक्का आणि हृदय बंद पडून मृत्यू हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. हृदयविकार हा बद्ध जीवनशैली, व्यसने, अयोग्य आहार यामुळे बळावतो. हृदय बंद पडणे ही क्रिया अन्य अनेक कारणांमुळे होऊ शकते. त्यासाठी हृदयविकारच कारणीभूत असेल असे नाही, असे केईएम रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितले.
पाठारे व्यायामशाळेचे प्रमुख चेतन पाठारे यांनीही, व्यायाम किंवा खेळादरम्यान होणाऱ्या मृत्यूला ट्रेनर किंवा व्यायामशाळा जबाबदार नसल्याचे सांगितले. बऱ्याचदा अतिउत्साही तरुण काहीही पार्श्वभूमी नसताना एकदम भरपूर व्यायाम करतात. काही जण तर वयाच्या तिशीपर्यंत व्यायामाशी काहीही संबंध नसताना एकाएकी व्यायाम सुरू करून भराभर शरीर कमाविण्याचा प्रयत्न करतात. आहारही योग्य प्रकारचा आणि योग्य प्रमाणात घेत नाहीत. मानसिक ताण-तणावाखाली असतात, या सगळ्याचा एकत्रितरीत्या विपरीत परिणाम शरीरावर होतो. आजही सलमान किंवा जॉन अब्राहमचा एखादा चित्रपट आल्यानंतर महिन्याभरापुरती व्यायामशाळेत गर्दी करणारे तरुण आहेत, असेही पाठारे म्हणाले.

 

Web Title: Increasing risk of heart disease among young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.