वाढत्या उन्हामुळे त्वचाविकारांत होतेय वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:17 AM2018-04-15T04:17:50+5:302018-04-15T04:17:50+5:30

दिवसागणिक शहर-उपनगराचा पारा चढतच आहे; परिणामी तळपत्या सूर्यामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये त्वचाविकार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

 Increasing sunlight increases the risk of skin diseases! | वाढत्या उन्हामुळे त्वचाविकारांत होतेय वाढ!

वाढत्या उन्हामुळे त्वचाविकारांत होतेय वाढ!

Next

मुंबई : दिवसागणिक शहर-उपनगराचा पारा चढतच आहे; परिणामी तळपत्या सूर्यामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये त्वचाविकार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्वचेशी निगडित समस्यांचे प्रमाण वाढत असून त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या त्वचाविकाराचे रुग्ण वाढले असून यात वांग येणे, फंगल इन्फेक्शन तसेच औषधे आणि स्टिरॉइड्स घेऊन त्वचेवर गंभीर परिणाम झालेल्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक आजार डोके वर काढतात. थंडीनंतर वातावरण बदलल्यामुळे सर्दी-खोकला, संसर्गजन्य आजार वाढीला लागल्याचे दिसून येते.
आता याच विकारांबरोबर त्वचाविकारही वाढल्याचे डॉक्टर सांगतात. मोठ्या सरकारी रुग्णालयांत त्वचाविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गजकर्ण किंवा अन्य त्वचारोग पूर्वी साध्या पारंपरिक त्वचेच्या औषधांनी बरे होत; पण हल्लीचे त्वचारोग पारंपरिक औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे जास्त मात्रेच्या गोळ्या व औषधे द्यावी लागत असल्याचे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकृष्ण गोसावी यांनी सांगितले.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शायना रेहवान यांनी सांगितले की, त्वचारोगाचे हल्ली किमान ५० रुग्ण तपासतो. गेल्या काही वर्षांत त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी त्वचा विकारावर सहा आठवड्यांत नियंत्रण मिळत होते. पण आता त्यासाठी किमान तीनहून अधिक महिने लागतात.

वेळीच त्वचाविकार तज्ज्ञांकडे जा
कोणताही त्वचाविकार उद्भवल्यास रुग्ण प्रथम जवळच्या क्लिनिकमध्ये दाखवतात. ते डॉक्टर सर्वसाधारणपणे मिश्र औषधांचे घटक असलेली औषधे देतात. ज्यामध्ये कधी कधी स्टिरॉइडसह विविध स्वरूपाच्या औैषधांचे मिश्रण असते.
यातील एक घटक उपयोगी येतो, पण इतर तीन घटक हे गरज नसतानाही त्वचेला लावल्याने त्याचे दुष्परिणाम लगेच नव्हे तर कालांतराने त्वचेवर दिसू लागतात. यामध्ये त्वचा काळी पडणे किंवा खाज येणे, असे परिणाम दिसून येतात; जे कोणत्याच औषधाला दाद देत नाही. त्यानंतर रुग्ण त्वचाविकारतज्ज्ञांकडे जातात.
मात्र, सुरुवातीलाच त्वचेचा कोणताही विकार असेल आणि त्वचाविकारतज्ज्ञाचा सल्ला घेतला, तर सुरुवातीपासूनच योग्य उपचार करत विकार तातडीने बरे करता येतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

उन्हाळ्याच्या दिवसात रोजच्या आहारात करा थोडासा बदल...
मुंबई शहर आणि उपनगरातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकर उष्णतने हवालदिल झाले आहेत, पण या दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात डोकेदुखी, कफ दोष, आम्लपित्तदाह यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. मात्र, दररोजच्या आहारात थोडा-फार बदल केल्यास शरीराला थंडावा आणि उन्हाळ्याच्या दिवसातही काम करण्यासाठी ऊर्जा मिळू शकते, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर प्रसन्न वातावरणात व्यायाम, योगासने, ध्यानधारणा केल्यावर मानसिक थकवा कमी होतो. सकाळी अंघोळ करतेवेळी हलके कोमट पाणी घेऊन त्यात एक लिंबू पिळावे, तसेच साबणाऐवजी गुलाब कळी, मंजिष्ठा, संत्र्यांच्या सालीचे चूर्ण इत्यादी प्रकारचे सुगंधी उटणे वापरल्यास शरीराला थंडावा मिळतो. प्रवासावेळी, कार्यालयात काम करत असताना, अनंत, मोगरा, सोनचाफा, जाई, जुई यासारखी सुगंधी फुले सोबत ठेवल्याने मनप्रसन्न होते. सुगंधी फुलांमुळे ताणतणाव, थकवा कमी होतो.
हेमंत-शिशिर (हिवाळ्याच्या दिवसात) महिन्यातील थंड वातावरणामुळे शरीरात कफ गोठतो. वसंत ऋतूमध्ये उत्तरायणातल्या सूर्याच्या प्रखर किरणांच्या तेजामुळे वितळून शरीरात कफदोष होण्याची संभाव्यता असते. कफ दोषामुळे शरीरातील पचनशक्ती मंदावते. या दिवसात कडुनिंबाची पाने, धणे आणि गूळ यांचे सेवन केल्याने शरीरातील कफाचा नाश होतो आणि जठराग्नी सुस्थितीत राहते. कडुनिंबाच्या पानामुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होतात. धणे हे पित्तशामक, दाहशामक, तसेच शरीराला थंडावा देणारे असल्याने याचा वापर करणे आवश्यक आहे.

हे पदार्थ टाळा...
उन्हाळ्यात पचनास जड पदार्थ आहारात नसावेत. मैदा, बेकरीतील पदार्थ (खारी, बटर, बिस्कीट) याचे सेवन करणे टाळावे.
इटली, डोसा यांसारखे आंबावलेले पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात टाळावेत. हे पदार्थ खाल्ल्याने डोकेदुखी, आंबट ढेकर यांचा त्रास होतो.
शिळे अन्न, तेलकट पदार्थ (लोणचे, तळलेले पदार्थ), तिखट पदार्थ, मसालेदार भाज्या, उडीदडाळ पापड, हिरवी मिरची, यामुळे पित्ताची शक्यता वाढू शकते.

हलका आहार घ्या
आहारात हलके (लवकर पचणारे) पदार्थ असावेत. जेणेकरून पचनक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. भात, गहू, मूगडाळ यांची पेज करून प्यायल्यास शरीरात ऊर्जा निर्माण होते. खरबूज, कलिंगड, काकडी, कैरी यांचे रस करून प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.

Web Title:  Increasing sunlight increases the risk of skin diseases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य