बेस्ट कर्मचाऱ्यांना इतर कामगार संघटनांचा वाढता पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 07:26 PM2019-01-11T19:26:52+5:302019-01-11T19:27:21+5:30
कामगार संघटना कृती समितीही पाठीशी : मनपातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर जाणार
मुंबई : बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपानंतर प्रशासनाने कामगारांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, प्रशासनाने वाटाघाटी करून तोडगा काढण्याऐवजी केलेली कारवाई निषेधार्ह असल्याचा आरोप करत विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी बेस्ट कामगारांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वेळ पडल्यास संबंधित क्षेत्रातील कामगारांनी संपावर जाण्याचा इशाराही सरकारला दिला आहे.
हिंद मजदूर सभा या केंद्रीय कामगार संघटनेने बेस्ट कामगारांना शुक्रवारी पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय वढावकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कामगार संघटना कृती समितीने बेस्ट कामगारांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. बेस्टच्या मुजोर प्रशासनाने संपाची दखल घेतली नाही, तर हिंद मजदूर सभेशी संलग्नित एसटी कामगार संघटना, बंदर व गोदी कामगार संघटना आणि माथाडी कामगार संघटना या व इतर संघटनाही संपात सक्रिय सहभागी होतील. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी प्रशासनाकडून संप चिरडण्यासाठी घरे खाली करण्याच्या नोटीसा आणि मेस्माअंतर्गत कारवाई सुरू आहे. मात्र ‘हम करोसे’ या प्रशासनाच्या वृत्तीला रोखण्यासाठी हिंद मजदूर सभेशी संलग्नित सर्व संघटना कामगारांना त्यांचे न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरतील, अशा इशारा वढावकर यांनी दिला आहे.
कामगार संघटना संयुक्त कृती समितीने बेस्ट कामगारांच्या समर्थनार्थ भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने केली. समितीचे निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले की, प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात बेस्ट टिकवण्यासाठी सर्वसामान्य जनतेनेही कामगारांच्या पाठिशी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. म्हणूनच कामगारांची बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी मुंबईतील वेगवेगळ््या ठिकाणी कृती समितीसोबत बेस्ट कामगार निदर्शने करतील.
...तर मनपा कर्मचारीही आंदोलन करणार!
बेस्ट कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी संप चिरडणाºया प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी मोठा भाऊ म्हणून मुंबई महापालिकेतील कर्मचारीही वेळ पडल्यास आंदोलन करतील, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. जाधव म्हणाले की, तुर्तास तरी त्रिस्तरीय समितीच्या भूमिकेकडे युनियनचे लक्ष आहे. मात्र त्यातही तोडगा निघाला नाही, तर कार्यकारिणीची बैठक घेऊन युनियन तीव्र आंदोलनाची घोषणा करेल.