लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना मुंबईतही या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात साथीचे आजार मुंबईला बेजार करतात. मात्र या वेळेस पावसाळ्यापूर्वीच लेप्टो आणि स्वाइन फ्लूमध्ये वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यातच स्वाइनचे १७ रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत; तर लेप्टोच्या रुग्णांची संख्याही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत असल्याचे उघड झाले आहे. मुंबईत पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला असे आजार वाढतात. तसेच डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात होत असल्याने मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. मात्र या वर्षी कमालीचा उकाडा वाढला असून, त्याबरोबर स्वाइन फ्लूही वाढला आहे. गेल्या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूचा एकच रुग्ण मे महिन्यात आढळला होता. या वर्षी मे महिन्याच्या १८ तारखेपर्यंत स्वाइन फ्लूच्या तब्बल १७ रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात झाली आहे. जानेवारी २०१७ ते १८ मे २०१७ या कालावधीत स्वाइन फ्लूच्या एकूण ३७ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबईमध्ये मागील वर्षी मे महिन्यात डेंग्यूच्या २७ रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी मे महिन्याच्या १८ दिवसांत १८ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मलेरियाच्या ४२३ रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी १८८ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी लेप्टोच्या दोन रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी सात रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी गॅस्ट्रोच्या ९२० रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी अद्याप ४६९ रुग्णांची नोंद झाली आहे. हेपेटायटीसच्या १३५ रुग्णांची गेल्या वर्षी नोंद झाली होती. या वर्षी आतापर्यंत ४४ रुग्णांची नोंद झाली आहे. २०१५मध्ये स्वाइन फ्लूचे ३०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३०हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण सापडले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. २०१७मध्ये मुंबईत आतापर्यंत ३७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. १ जानेवारी ते ३० एप्रिल २०१७पर्यंत राज्यभरात ५००हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यात १९६हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे.
स्वाइन फ्लू आणि लेप्टो वाढतोय
By admin | Published: May 25, 2017 12:45 AM