- मनीषा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीसोबतच सायबर युद्धही वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हानही पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. यादरम्यान चुकीचे संदेश तसेच व्हिडीओ व्हायरल करून भारतीयांचे मनोबल खच्चीकरण करणे, शिवाय शत्रूचा चांगला चेहरा दाखविणे, विषयांतर करून जातीवाद घडविण्याचा प्रयत्न सोशल मीडियाचा वापर करून होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर कुठलीही माहिती, व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.
पुलवामा हल्ल्यानंतर सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत विविध संकेतस्थळे, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडीओ, माहिती शेअर केली जात आहे. सुरुवातीला विंग कमांडर अभिनंदन यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यानंतर त्यांना चांगली वागणूक देण्याचा व्हिडीओ पाकिस्तानकडून शेअर झाला. जेणेकरून पाकिस्तानबाबत भारतीयांच्या मनात चांगली भावना निर्माण होईल. काही टक्के नागरिक तरी त्यांच्या बाजूने चांगला विचार करतील, या अपेक्षेने अशा स्वरूपाचे अनेक व्हिडीओ येत्या काळात शेअर होण्याची भीती सायबर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
युद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात ‘सायबर युद्ध’ तितकेच घातक ठरत असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. सायबर युद्धात सोशल मीडियाच्या आधारे शत्रू स्वत:ची बाजू, चुकीची माहिती भारतीयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. याचे वेगवेगळे पैलू आहेत.
अशा स्वरूपाच्या खोट्या बातम्या, अफवांबाबत कुठलीही माहिती शेअर करण्यापूर्वी स्वत: खातरजमा करणे गरजेचे आहे. अन्य संकेतस्थळे तसेच अधिकृत यंत्रणा, अधिकारी यांच्या माहितीवरच विश्वास ठेवा, असे आवाहन राज्याचे सायबर विभागाचे अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून नागरिकांना केले.तुम्हाला येणाऱ्या व्हिडीओची अधिकृतता पडताळून पाहा. कोणी चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी केले.टिष्ट्वटरवरून पोलिसांचे आवाहनचुकीची माहिती तेथेच डीलीट करून योग्य माहिती शेअर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. अफवा रोखण्यासाठी त्यांनी सोशल मीडीयाचा आधार घेतला. व्हॉट्सअॅपद्वारे आपण काय फॉरवर्ड करतोय आणि काय करायला हवे याबाबत या ट्विटद्वारे माहिती देण्यात आली.