वाढत्या वाहनांचा भार
By admin | Published: January 16, 2016 02:07 AM2016-01-16T02:07:29+5:302016-01-16T02:07:29+5:30
दिल्लीत वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘सम-विषम’ नंबर प्लेटचा फॉर्म्युला राबण्यात आला. हाच प्रयोग मुंबईतही होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे, मात्र या फॉर्म्युल्याची
मुंबई : दिल्लीत वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘सम-विषम’ नंबर प्लेटचा फॉर्म्युला राबण्यात आला. हाच प्रयोग मुंबईतही होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे, मात्र या फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतेच एका कार्यक्रमात स्पष्ट केले. मुंबईपेक्षा दिल्लीत वाहनसंख्या आणि प्रदूषण जास्त असल्याचे कारण त्यांनी दिले आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र गेल्या पाच वर्षांत रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या पाहिल्यास जवळपास ६ लाख ६६ हजार ९३५ वाहनांची भर पडली असून ही वाढ १0.२२ टक्के असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
पश्चिम उपनगरावर वाढत्या वाहनांचा भार अधिक पडत आहे. बोरीवली, जोगेश्वरी, गोरेगाव, वांद्रे या परिसरात सर्वाधिक वाहतूककोंडी होत आहे. वाहनांची संख्या वाढत राहिल्यास भविष्यात वाहतूककोंडी, पार्किंगबरोबरच प्रदूषणाची समस्याही गंभीर होऊ शकते. मुंबईत वाहतूककोंडी, पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. वाहनांची संख्या मर्यादित राहावी यासाठी परिवहन विभागाकडून केंद्र सरकार दरबारी प्रयत्नही करण्यात आले. एक घर एक वाहन बाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून त्यासाठी मंजुरी मिळविण्यासाठी धडपड करण्यात आली. मात्र या प्रस्तावावर शासनाकडून विचारही करण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला. जर याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले असते तर वाहतूककोंडी, पार्किंगबरोबरच प्रदूषणही रोखण्यात यश आले असते, असे मत परिवहन विभागातील अधिकारी व्यक्त करतात. सध्या मुंबईत २६ लाख ९५ हजार ४३५ वाहने रस्त्यावर धावतात. २0११-१२ मध्ये हीच आकडेवारी २0 लाख २८ हजार ५00 एवढी होती. एकूणच यात भरमसाट वाढ झाल्याचे दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई पश्चिम उपनगरांत तर सर्वात जास्त वाहने धावत आहेत. २0११-१२ मध्ये ९ लाख ५0 हजार ३९४ वाहने पश्चिम उपनगरांत धावत होती. तर आता त्याची संख्या वाढून १२ लाख ८३ हजार १२३ एवढी झाले आहे. या उपनगरांवर सर्वात जास्त भार पडत असल्याने येथे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
एलिव्हेटेड रस्त्यांचा पर्याय
शासनाकडून सहा पदरी उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रस्ते) बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता मुंबईतील एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पांना समांतर असेल.
मात्र त्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एलिव्हेटेड रस्ते बनवायचे झाल्यास त्या-त्या भागात वाहतूक सेवेवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पावर चर्चाच सुरू आहे.
न्यायालयानेही केल्या सूचना
वाहने उभी करण्यासाठी वाहन मालकाकडून जोपर्यंत जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जात नाही, तोपर्यंत वाहनांची नोंदणी होणार नाही, अशी अट घालण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. यातून पार्किंगची समस्या किती मोठी आहे हेच न्यायालयाने दाखवून दिले होते.
दक्षिण मुंबईत पार्किंगची समस्या
दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी कार्यालये, व्यापारी संकुले, कॉलेज आणि शाळा आहेत. त्यामुळे या भागात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मोहम्मद अली रोड परिसरात पार्किंगमधूनच अन्य वाहनांना त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. त्यातच अवजड वाहनांचीही भर पडत असल्याने मोठी डोकेदुखीच ठरते.
यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मुंबईत जवळपास २0 हजार गाड्यांना पार्किंगसाठी जागाच नसल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या अभ्यास अहवालातून स्पष्ट झाले आहे. यात दुचाकी, तीन आणि चार चाकी वाहनांबरोबरच अवजड वाहनांचाही समावेश आहे.
पार्किंगचा तिढा सुटावा यासाठी बीपीटीच्या काही मोकळ्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध होतात का याची चाचपणी सुरू आहे. २0१५ मध्ये मुंबईत अनधिकृत पार्किंग प्रकरणी ४ लाखांपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.