वाढते काम, अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोस्टमनवर पडतोय जादा भार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 05:02 AM2018-10-09T05:02:11+5:302018-10-09T05:02:31+5:30
मोबाइल आणि सोशल मीडियामुळे संदेशवहन सोपे झाल्याने पत्र ही संकल्पना मागे पडली. मात्र, पोस्टमन आजही दारोदारी फिरताना दिसतात. काळ बदलला तसे पोस्टमनचे कामही बदलले आणि वाढलेही.
- कुलदीप घायवट
मुंबई : मोबाइल आणि सोशल मीडियामुळे संदेशवहन सोपे झाल्याने पत्र ही संकल्पना मागे पडली. मात्र, पोस्टमन आजही दारोदारी फिरताना दिसतात. काळ बदलला तसे पोस्टमनचे कामही बदलले आणि वाढलेही. त्या तुलनेत रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वाढते काम आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे पोस्टमनवर जादा कामाचा भार पडू लागला आहे. आज जागतिक टपाल दिनानिमित्ताने अशाच काही पोस्टमननी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे आपले म्हणणे मांडले.
वेळेवर आणि अचूक पत्त्यावर पत्र पोहोचवण्याची प्रमुख जबाबदारी पोस्टमनवर असतेच; पण आता टपाल जीवन विमा योजना, ग्रामीण टपाल विमा योजना, पासपोर्ट सेवा केंद्र, आधारचे काम, इंडिया पेमेंट पोस्ट बँक ही कामेदेखील पोस्टमनलाच करावी लागत आहेत.
सकाळी ८ ते दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत काम संपते. रोज पाठीवर २० ते ३० किलोचे वजन घेऊन पत्र, रजिस्टर, लेटरहेड, स्पीड पोस्ट वाटत असतो, असे एका पोस्टमनने सांगितले. तर दररोज २२ ते २५ इमारतींमध्ये चढ-उतार करावी लागत आहे. या इमारतींना लिफ्टची सुविधा नसल्याने पायाची दुखणी वाढत असल्याची व्यथा अन्य एका पोस्टमनने व्यक्त केली.
नवनवीन आधुनिक कामे पोस्टमनवर सोपविल्याने कामाचा व्याप वाढत आहे. मात्र, आम्ही वयाच्या ५९ व्या वर्षी आनंदाने काम करत आहोत. काळानुसार बदलणे अपेक्षित असल्याने या काळाच्या प्रवाहात वाहत जाणे योग्य असल्याची भावना पोस्टमनने व्यक्त केली.
अनेक वर्षांपासून टपाल खात्यात मोठी भरती करण्यात आली नाही. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कामाचा ताण इतर कर्मचाºयांवर पडतो. तत्काळ कामगार भरती करण्याची गरज असल्याची भूमिका एका पोस्टमनने मांडली.