अवकाळी पावसाने मुंबईला झोडपले!
By admin | Published: March 1, 2015 01:25 AM2015-03-01T01:25:19+5:302015-03-01T01:25:19+5:30
उत्तर भारतात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलाच धिंगाणा घातला.
मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलाच धिंगाणा घातला. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना पडलेल्या अवकाळी पावसाने दुपारपासून रात्रीपर्यंत मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून पूर्वेकडे जे वारे वाहतात, त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतात काही ठिकाणी पाऊस पडतो. आणि याच पावसाच्या जोरावर उत्तर भारतात पिकेही काढली जातात. मात्र वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (पश्चिमी प्रकोप) उत्तर भारतावर निर्माण झालेले पावसाचे ढग मध्य भारतावर सरकले. परिणामी या ढगांनी मुंबईसह राज्यातही अवकाळी मारा केला.
दक्षिण मुंबईत फोर्ट, गिरगाव, भायखळा, वरळी, मध्य मुंबईत चिंचपोकळी, लालबाग, दादर आणि पूर्व उपनगरांत कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूरसह पश्चिम उपनगरांत गोरेगावसह बोरीवली या ठिकाणांना पावसाने झोडपून काढले. दुपारी किंचितसा पडणारा हा पाऊस सायंकाळी मात्र वेगाने कोसळू लागल्याने कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. शिवाय उन्हाचे चटके बसणाऱ्या मुंबईकरांना आज थेट पावसाचा सामना करावा लागल्याने काहींनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत घर गाठल्याचे चित्र होते.
ठाण्याला तडाखा
ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात अडथळे आले. ग्रामीण भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भाजीपाल्यासह आंबा पिकाला पावसाचा चांगलाच तडाखा बसला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर या शहरी भागांत काही ठिकाणी वाहने घसरून काहीजण किरकोळ जखमी झाले.
विदर्भात दोन बळी
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे दुपारी ४ वाजता वीज कोसळून पांडुरंग मल्हारी चिकणे (४५) हे जागीच ठार झाले़ अमरावती जिल्ह्णात दर्यापूर तालुक्यातील उमरी येथे कुमरजी पुनाजी कास्देकर (४०) यांच्या अंगावर वीज कोसळली. (प्रतिनिधी)
च्रायगड जिल्ह्यात शनिवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यानंतर वादळी वाराही सुटला होता. मुरुड, रसायनी, पनवेल, खालापूर परिसरात पावसाने जोर धरल्याने नागरिकांची काही वेळासाठी तारांबळ उडाली. या ढगाळ वातावरणामुळे शेतीमधील भाजीपाला व आंबा या पिकांवर रोग पडण्याची शक्यता जास्त आहे.
च्आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे, तर काही ठिकाणी आंबा फळाचे कण पकडले आहेत. त्यामुळे आता पिकाचे नुकसान होईल, या भीतीने बागायतदार चिंतेत आहेत.
च्आंबा, सुपारी पिकावर बुरशी नावाचा रोग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर करपेल व पकडलेल्या फळाला गळ लागण्याची शक्यता आहे. यापासून संरक्षण करण्यासाठी आंबा बागायतदारांना औषध फवारणी करावी लागणार आहे. अलिबाग तालुक्यात तोंडली, वाल व घेवडा या भाजीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतू वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे.
तापमानात किंचित घट
कोकण, गोव्यासह काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
१ मार्च : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२ मार्च : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इशारा : १ आणि २ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.