माकडतापाच्या रुग्णांमध्ये वाढ

By admin | Published: January 24, 2017 12:01 AM2017-01-24T00:01:03+5:302017-01-24T00:01:03+5:30

आणखी दोन रुग्ण आढळले : संख्या पाचवर; बांदा परिसरात घबराट

Increment in CPI (M) patients | माकडतापाच्या रुग्णांमध्ये वाढ

माकडतापाच्या रुग्णांमध्ये वाढ

Next

बांदा : बांदा शहरातील सटमटवाडी परिसरात माकडतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी आणखी दोन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. त्यामुळे रुग्णसंख्या आता पाचवर पोहोचली आहे.
सटमटवाडीत तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, अजून चार रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी जंगम यांनी सटमटवाडी येथे भेट देत शेतकऱ्यांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. यावेळी आरोग्य पथकासोबत आलेले वनक्षेत्रपाल विजयकुमार कदम यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
प्राथमिक आरोग्यकेंद्राचे आरोग्य सेवक असलेले राजन वासुदेव गवस (४0, रा. बांदा-गडगेवाडी) व सतीश सगुण नाटेकर (५५, रा. बांदा-बाजारवाडी) हे दोन रुग्ण नव्याने सापडले आहेत. माकडतापाने सटमटवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सटमटवाडी येथे जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी जंगम, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत सवदी, दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, जिल्हा पर्यवेक्षक किशोर लाड यांनी स्थानिकांना माकडताप व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बाधित क्षेत्रात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले असूून मेलिथॉन पावडरची फवारणी करण्यात आली आहे. तसेच जंगलात व शेतात काम करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना डीएमपी आॅईलचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी अश्विनी जंगम म्हणाल्या की, माकडताप हा संसर्गजन्य रोग नाही. त्यामुळे याला घाबरुन जाऊ नका. जंगलात जाताना आपले अंग पूर्ण झाकले जाईल असा पेहराव करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. डॉ. जगदीश पाटील यांनी तापाची लक्षणे दिसल्यास तत्काळ आरोग्यकेंद्रात तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बांदा सरपंच बाळा आकेरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, पूर्णरेखा मावळणकर, महेंद्र मांजरेकर, संतोष मांजरेकर, अनिल मांजरेकर, बाळकृष्ण मांजरेकर, सुरेश मांजरेकर, सुलक्षणा मांजरेकर, जीवबा वीर, सचिन वीर, प्रसाद वीर, विवेक केळुस्कर, विष्णू केळुस्कर, अनिल आरोस्कर, आनंद आरोस्कर, प्रमोद मावळणकर, दिवाकर मावळणकर, दीपक पेंडसे, उदय ओगले, देवानंद कळंगुटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वनक्षेत्रपाल धारेवर
जिल्हा आरोग्य पथकासोबत वनक्षेत्रपाल विजयकुमार कदम, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, वनरक्षक ए. सी. राठोड आले असता स्थानिकांनी त्यांना धारेवर धरले. जंगली माकडे मृत होत असतानाही वनखात्याला कल्पना देऊनही कोणतीही उपाययोजना न केल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मृत माकडांचे शवविच्छेदन करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याची माहिती कदम यांनी दिली.

Web Title: Increment in CPI (M) patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.