लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ती अवघ्या चार वर्षांची... खेळण्याबागडण्याच्या वयात तिला असाध्य आजाराने गाठले...दहा लाखांत एखाद्यालाच होणारा तो आजार... मात्र, अत्याधुनिक उपचारांमुळे तिचे प्राण वाचले... पेसमेकरचा तिला आधार मिळाला... जे. जे. रुग्णालयात तिच्यावर मोफत उपचार करण्यात आले. एरवी खासगी रुग्णालयात त्यासाठी मुलीच्या पालकांना पाच लाख रुपये मोजावे लागले असते...
ही कहाणी आहे निधी बावधानेची. सिंधुदुर्गात राहणारी निधी बालवाडीत शिकते. एके दिवशी तिला अचानक चक्कर आली. त्यात ती बेशुद्ध पडली. स्थानिक डॉक्टरांनी निधीच्या सर्व चाचण्या केल्या. त्यात तिच्या हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याचे आढळून आले. त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होऊन पुढील सर्व गुंतागुंत होत असल्याचे निदान झाले. या स्थितीला वैद्यकीय भाषेत कंजनायटल लाँग क्विटी सिंड्रोम विथ कम्प्लिट हार्ट ब्लॉक असे संबोधतात. दहा लाखांत एखाद्यालाच हा आजार जडतो. पेसमेकर बसविणे हाच त्यावरील उपचार. त्यासाठी निधीला जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. निधीच्या हृदयाचे ठको प्रतिमिनिट ३० ते ३५ होते. तिचे वजन फक्त १२ किलो होते व शरीराची होणारी वाढ लक्षात घेऊन तिच्यावर पेसमेकर बसविणे गरजेचे होते. त्यानुसार ते दोन महिन्यांपूर्वी बसविण्यात आले. ती आता सर्वसामान्य आयुष्य जगत आहे.
मी आणि माझ्या विभागातील सहकाऱ्यांनी ही इतक्या लहान मुलीवर पेसमेकर बसविण्याची आमची पहिलीच वेळ आहे. कारण फार हृदयाच्या दुर्मीळ आजारात हे उपचार करावे लागतात. १२ किलो वजन असलेल्या मुलीवर या अवस्थेत शस्त्रक्रिया शक्य नव्हती. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे या अशा उपचारासाठी खासगी रुग्णालयात ४ ते ५ लाख खर्च येतो. मात्र या रुग्णालयात दीड लाखांपर्यंतचा खर्च महात्मा फुले योजनेतून करण्यात आला. - डॉ. कल्याण मुंडे, विभागप्रमुख, हृदयविकार विभाग, सर जे. जे. रुग्णालय
पेसमेकरचे कार्य कसे चालते?पेसमेकरच्या साहाय्याने हृदयाची बिघडलेली ठोके पूर्वपदावर आणणे शक्य होते. हृदयाचे ठोके अनियमित होतात त्यावेळी पेसमेकरच्या साहाय्याने ते नियमित केले जातात. यामध्ये विद्युतकंपने निर्माण करून हृदयाची आकुंचन आणि प्रसरण प्रक्रिया नियंत्रित केली जाते. पेसमेकर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पेसमेकर बसविलेल्या रुग्णाची देखभाल करणे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खूप सोपे झाले आहे. पेसमेकर हृदयाच्या वरच्या बाजूस बसविले जाते. दहा वर्षांनंतर मात्र बॅटरी बदलण्यासाठी पुन्हा छातीच्या वरच्या बाजूस त्या भागापुरते भुलीचे इंजेक्शन देऊन थोडा छेद घेऊन ती बदलता येते.