इंद्राणीनेच दाबला शीनाचा गळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:24 AM2017-07-29T05:24:40+5:302017-07-29T05:24:44+5:30
शीना बोरा हत्या प्रकरणातील ‘माफीचा साक्षीदार’ श्यामवर राय याने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांची मुलगी शीना बोराचा गळा दाबून तिला मारल्याचे व नंतर तिचा मृतदेह जाळल्याचे न्यायालयाला सांगितले.
मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील ‘माफीचा साक्षीदार’ श्यामवर राय याने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांची मुलगी शीना बोराचा गळा दाबून तिला मारल्याचे व नंतर तिचा मृतदेह जाळल्याचे न्यायालयाला सांगितले.
या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी, तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना व पीटर मुखर्जीवर सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. सीबीआय न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असून शुक्रवारी महत्त्वाचा साक्षीदार व इंद्राणी मुखर्जी यांच्या गाडीचा चालक श्यामवर राय याने साक्ष नोंदविली.
राय म्हणाला, इंद्राणीच्या स्वीय सहायकाने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली होती. सुरुवातीला ते दोघे ‘स्काइप’वरून बोलत. शीना व मिखाईल यांना संपवायचे असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. शीना आणि मिखाईल हे दोघे मी त्यांची आई आहे, असे सांगून माझी बदनामी करत असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. इंद्राणीने शीना व मिखाईल आपली मुले नसून भावंडे असल्याचे सर्वांना सांगितले होते. मात्र शीना त्याचाच फायदा घेऊन आपल्याला ब्लॅकमेल करते. ती पाली हिल येथे तीन बेडरूमचे घर, कार आणि मोती महलमधून हिºयाच्या अंगठीची आपल्याकडे मागणी करत आहे, असे इंद्राणीनेच सांगितल्याची साक्ष रायने न्यायालयाला दिली. २४ एप्रिल २०१२ रोजी मोती महलमधून हिºयाची अंगठी देण्याच्या बहाण्याने इंद्राणीने शीनाला भेटायला बोलावले. इंद्राणीने वांद्रे येथे मला येण्यास सांगितले. तिच्याबरोबर शीनाही होती. शीना कारच्या पाठिमागच्या सीटवर शांत बसली होती. त्यानंतर गाडी पनवेलच्या जंगलाजवळ नेण्यात आली. संजीव खन्नाने शीनाचे केस ओढले. मी तिच्या तोंडावर हात ठेवला. मात्र शीनाने माझा अंगठा जोरात चावला. इंद्राणीने दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला. ‘घे तीन बेडरूमचा फ्लॅट घे...’, असे इंद्राणी ही शीनाचा गळा आवळताना म्हणत होती. शीना रडत होती, ओरडत होती. काही वेळाने शांतता पसरली, असे राय याने सांगितले.