मुंबई : आरे युनिट नं. ३२ येथील सार्वजनिक जागा बळकावणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलीस व आरे प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट भूमाफियांच्या सांगण्यावरून येथील ११ महिलांवर खोटा गुन्हा दाखल केल्याने याविरोधात आवाज उठवत ‘जागतिक महिला दिनी’ आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
गोरेगाव पूर्व आरे कॉलनीतील युनिट क्र. ३२ मध्ये भूमाफियांनी सार्वजनिक जागा बळकावून तिथे अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. स्थानिक रहिवाशांनी याबाबत स्थानिक वनराई पोलीस ठाण्यात व आरे प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र या दोन्ही यंत्रणांनी याकडे सपशेल दुर्लक्ष करीत उलट तक्रारदार महिलांवर गुन्हा दाखल केला.
या अन्यायाविरोधात आरेतील युनिट नं. ३२ च्या महिलांनी एक पत्रक काढले असून, यात जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे यांच्या कार्यालयासमोर ८ मार्च - जागतिक महिला दिनी बेमुदत उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.