MPSC उत्तीर्ण अभियंत्यांचे नियुक्तीपत्रासाठी बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:26 PM2023-10-03T19:26:52+5:302023-10-03T19:26:52+5:30

गाव, घर, कुटुंब सोडून विद्यार्थी आझाद मैदानात

Indefinite hunger strike for appointment letter of MPSC passed engineers | MPSC उत्तीर्ण अभियंत्यांचे नियुक्तीपत्रासाठी बेमुदत उपोषण

MPSC उत्तीर्ण अभियंत्यांचे नियुक्तीपत्रासाठी बेमुदत उपोषण

googlenewsNext

श्रीकांत जाधव 

मुंबई : एमपीएससीची कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नसल्याने संतापलेल्या उत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला दोन दिवस झाले. विद्यार्थ्यांना राज्याच्या मुख्य सचिवांना भेटायचे आहे. तरी सरकार आणि शासनाकडून त्यांना भेटीचे अद्याप बोलावणे आलेले नाही. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करीत संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या उपोषणाची धार अधिक तीव्र केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २०२०' चा निकाल ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाला होता. 
तसेच १२ ऑगस्ट २०२२ रोजी एमपीएससीकडून शासनाकडे विभागवार शिफारस करण्यात आली आहे. मात्र वर्ष झाले तरी अद्याप उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आलेली नाहीत.

सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना एस ई बी सी आर्थिक दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातुन लाभ देणायचा शासन निर्णय रद्द झाल्याने तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे नियुक्तीपत्र देण्यात आलेली नाहीत असे विद्यार्थांना सांगण्यात येते. मात्र, इतर प्रवर्गातील १९६ उतीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे शक्य असूनही ते देण्यास राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे. 

निकालानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२२ मध्ये विभागांकडून उत्तीर्ण शिफारसपात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.  त्याला आता एक वर्ष होत आले. तरी शासनाकडून अद्याप नियुक्तीपत्राबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या उत्तीर्ण शिफारसपात्र उमेदवारांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

Web Title: Indefinite hunger strike for appointment letter of MPSC passed engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.