श्रीकांत जाधव, मुंबई : माथाडी, हातगाडी गरीब कष्टकरी कापड बाजारातील कामगार त्यांच्या घरांसाठी कांदिवली चारकोप येथे देण्यात आलेल्या ७ एकर भूखंडावरील गृहसंकुलाचे बांधकाम सात वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे हजारो कामगार घरापासून वंचित आहेत. तेव्हा संतापलेल्या कामगारांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले आहेत.
कांदिवली येथील रखडलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे, यासाठी कापड बाजार कामगार नव गृहनिर्माण समितीचे संयोजक धर्मराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो माथाडी, हातगाडी कामगार गेल्या २९ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपोषण करीत आहे. मात्र अद्याप शासनाकडून त्याचा उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कामगारांनी आझाद मैदानात उपोषणात उपस्थिती दर्शवून शासनाचे लक्षवेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी कामगारांनी गृहसंकुलाच्या बांधकाम सुरू करण्याचे आदेश शासनाने दयावेत, ७ एकर जागेवरील विकास आराखड्यातील रुग्णालय, मैदान रस्ता आरक्षणे वगळणे, उपनगर जिल्हाधिकारी यांनी ही जागा अपर आयुक्त, कोकण विभाग मुंबईत यांच्या ३१ जानेवारी, २०२३च्या आदेशानुसार कापड बाजार आणि दुकाने मंडळास कामगारांच्या घरबांधणीसाठी परत करणे तसेच बांधकामास मुदतवाढ देणे अशा मागण्या केल्याचे जाधव यांनी सांगितले.